Maharashtra News: वीज कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात १९ टक्क्याने वाढ केली जाणार आहे. यात कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांचा समावेश आहे. या कामगारांच्या पगारवाढीचा करार १ एप्रिल २०२३ पासून प्रलंबित होता. या करारवाढीच्या संदर्भात रविवारी (७ जुलै २०२४) उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यापूर्वी झालेल्या एका बैठकीत वीज कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये १५ टक्के आणि भत्त्यामध्ये १०० टक्के वाढ देण्याचे सूचित केले. त्यासाठी कंपन्यांवर १ हजार ४३५ कोटी रुपयांचा आर्थिक भार येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.मात्र, कामगार संघटनांनी ही वाढ असमाधानकारक असल्याचे त्यांना सांगितले. यावर फडणवीस यांना मार्ग काढण्याची विनंती केली. परंतु, लोकसभेचा कार्यक्रम जाहीर झाला आणि आचारसंहिता सुरू झाल्याने हा मुद्दा पुढे सरकला.
दरम्यान, पगारवाढीचा करार तात्काळ करावा याकरीता वीज कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनास नोटीस दिली. गेल्या महिन्यात २४ जून ते २८ जूनदरम्यान प्रचंड द्वारसभा झाल्या. यानंतर कर्मचाऱ्यांनी येत्या ९ जुलैपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.या बैठकीत कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालीलप्रमाणे पगारवाढ जाहीर केली.कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येईल. सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ मान्य करण्यात आली. ३ वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना ५००० रुपये वाढ करण्यात आली. लाईनवर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त १००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, तिन्ही वीज कंपन्यांचेअध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र (महावितरण), संजय कुमार (महापारेषण) व डॉ.पी.अनबलगन (महानिर्मिती), संचालक (मासं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते. प्रलंबित विषयवार लवकरच अनामलिज कमिटी कालबद्ध कार्यक्रम ठरवून निर्णय घेणार, असे निर्देशित करण्यात आले.
संबंधित बातम्या