Soybean Purchase Deadline Extended : सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना सरकारने मोठा दिलासा देत सोयाबीन खेरदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीची मुदत आज (३१ जानेवारी) संपणार असल्याने खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती व केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे.
राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या ३ वर्षाचा विचार करता, सोयाबीनच्या दरात ३१ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, राज्यात ३१ जानेवारीपर्यंत देण्यात आलेली सोयाबीन खरेदीची मुदत आज संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी, अशी राज्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती, ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता. आज ती मुदतवाढ मिळाली. यामुळे राज्याला दिलेले १४ लाख १३ हजार २६९ मेट्रिक टन पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य़ातील सोयाबीन खरेदी केंद्रावर ३० जानेवारीपर्यंत ४ लाख ३७ हजार ४९५ शेतकऱ्यांकडून ९ लाख ४२ हजार ३९७ मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे तर काही जिल्ह्यांना उद्दिष्ट वाढवून दिले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या