मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकऱ्यांना दिलासा, अखेर महाराष्ट्रासह देशातून मान्सून परतला

शेतकऱ्यांना दिलासा, अखेर महाराष्ट्रासह देशातून मान्सून परतला

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 23, 2022 02:39 PM IST

Monsoon: महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मोसमी पावसाने २३ ऑक्टोबर रोजी माघार घेतली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा, अखेर महाराष्ट्रासह देशातून मान्सून परतला
शेतकऱ्यांना दिलासा, अखेर महाराष्ट्रासह देशातून मान्सून परतला (AFP)

Monsoon: यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातलं. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून परतला आहे. हवामान विभागाने याची माहिती दिलीय. त्यामुळे आता दिवाळीत पाऊस पडणार नाही. फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या उर्वरित भागातूनही मान्सूनने माघार घेतली आहे.

गेल्या दशकभरात ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा झाली. मान्सून परतला असल्याची घोषणा हवामान विभागाने केली असली तरी काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात कुठेही पाऊस झालेला नाही. राज्यात गेल्या दोन आठवड्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली तर काही पिके पाण्यातच कुजली. याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.

राज्यात गेल्या काही वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यावर्षी झाला. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मान्सून राज्यातून माघार घेतो, पण यंदा हाच मान्सून तब्बल एक महिना उशिरा राज्यातून बाहेर गेला. तसंच देशातूनही नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. १२३ टक्के इतका पाऊस झाला असून सरासरीपेक्षा २३ टक्के इतका अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रातील वादळांचे प्रमाण वाढले असून कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे परिणामही वाढले आहेत. यामुळे महाराष्ट्रासह किनारपट्टीवर असणाऱ्या राज्यात पावसाचे प्रमाण जास्त दिसून आले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या