लोकसभा निवडणुकीतील सहा टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्या सोनिया दुहान (Sonia Duhan) यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करत पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया दुहान १० जून रोजी अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यस्तरीय बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा अजित पवार गटात प्रवेश केला. तर १० जून रोजी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सोनिया दुहान अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.
अजित पवार यांच्या गटातील पक्ष प्रवेशावर सोनिया दुहाननं भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवारांनी ४२ समर्थक आमदारांसह सत्ताधारी गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. निवडणूक आयोगाने अजित पवारांची राष्ट्रवादी खरा पक्ष ठरवून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं. तर शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. पक्षातील अनेक नेते अजित पवारांसोबत जात असताना सोनिया दुहान शरद पवारांसोबत होत्या.
मात्र आता त्यांनी पक्ष सोडणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, तूर्तास मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. अजित पवारांच्या पक्षात किंवा भाजपात जाण्याचा विचार नाही. शरद पवार आमचे नेते आहेत व मी त्यांच्याबरोबरच आहे. पण मी सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या त्रासामुळे मी पक्ष सोजणार असल्याचे दुहान म्हणाल्या.
सेल्फी काढल्याने आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन कोणताही पक्ष चालत नसतो. सुप्रिया सुळेंना आणि त्यांच्या आसपास वावरणाऱ्यांना ही गोष्ट समजली पाहिजे. धीरज शर्मा यांनीही याच कारणामुळे पक्ष सोडला आहे. शरद पवारांशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेले नेते, कार्यकर्ते त्यांची साथ का सोडत आहेत? हा विचार सुप्रिया सुळेंनी केला पाहिजे. काही दशकांपासून शरद पवारांबरोबर असलेले पक्ष सोडत आहेत. यामुळे उरलासुरला पक्षही संपेल.
पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्षाची वाटचाल सुरळीत सुरू होती. परंतु अचानकपणे सगळं काही बदललं, याचा विचार होणं गरजेचं आहे. अती झाल्यामुळे आता उद्रेक झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा विचार आतापर्यंत आम्ही केला नव्हता. मात्र पक्ष सोडण्यासाठी मजबूर केल्यामुळे पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.