Pune khadaki murder : पुण्यात गुन्हेगारीला उधाण आले आहे. औंध येथे आर्थिक वादातून मित्रावर गोळीबार करून आरोपीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना खडकी येथे घडली आहे. आरोपी मुलाने घटस्फोटाला आई जबाबदार असल्याच्या संशयातून कोयत्याने तिचा गळा कापून खून करून फरार झाला. पोलिसांनी आरोपी मुलाला शिर्डी येथून अटक केली आहे.
गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी ट्याला शिर्डीतून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंफाबाई मूळच्या श्रीरामपूर परिसरातील मुठे वडगावातील रहिवासी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. ज्ञानेश्वर खडकीत राहायला असून, तो दारूगोळा कारखान्यात कामाला आहे. तर दुसरा मुलगा देहूरोड परिसरात राहायला आहे. शनिवारी त्या मुलांना भेटण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वरचा घटस्फोट झाला आहे. तो एकटाच राहायला आहे. घटस्फोटाला आई जबाबदार असल्याचे त्याला त्याला वाटत होते. या संशयाचे भूत त्याच्या डोक्यात होते. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री गुंफाबाई या झोपल्या होत्या. ही संधि साधून आरोपी मुलाने कोयत्याच्या साह्याने त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपी मुलगा घराला कुलुप लावून फरार झाला.
रविवारी सकाळी गुंफाबाईच्या नातेवाईकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे त्यांनी देहूरोड परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वरच्या भावाशी संपर्क साधला. त्यानंतर ज्ञानेश्वरचा भाऊ रविवारी सकाळी खडकीतील त्याच्या भावाच्या घरी गेला. यावेळी त्याच्या घराला कुलूप दिसले. तर आईची चप्पल घराबाहेर दिसल्याने त्याचा संशय बळावला. त्याने खिडकीतून पहिले असता, आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.
या घटनेची माहिती त्याने खडकी पोलिसांना दिली. खडकी पोलिस त्यातडीने घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके पाठवली. गुंफाबाई यांच्या अंगावर दागिने होते. मात्र, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर घरात नव्हता. तसेच त्याने मोबाइल देखील बंद करून ठेवला असल्याने पोलिसांच्या त्याच्यावर संशय बळावला. दरम्यान तपास पथकाला तो, शिर्डीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर खडकी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केली.