मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border Dispute : समस्या सोडवा अन्यथा कर्नाटकात सामील होऊ; उमराणीच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा

Border Dispute : समस्या सोडवा अन्यथा कर्नाटकात सामील होऊ; उमराणीच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 27, 2022 11:39 AM IST

Umrani Village In Sangli Dist : सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या एका गावानं कर्नाटकात सामील होण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

Maharashtra-Karnataka Border Dispute
Maharashtra-Karnataka Border Dispute (HT_PRINT)

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. त्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शाब्दिक चकमकही झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील एका गावानं महाराष्ट्र सरकारला कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं आता सीमावादाच्या प्रश्नावरून पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील उमराणी या गावातील ग्रामस्थांनी रस्ता, पाणी आणि वीज यासंदर्भातील प्रश्न येत्या सहा महिन्याच्या आत सोडवा नाही तर आम्ही कर्नाटकात सामील व्हायला मागेपुढे पाहणार नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय याबाबतचा ठरावही ग्रामपंचायत पारित करणार आहे. याबाबतची एक सूचना गावात सर्वांना देण्यात आली आहे, त्यानुसार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करण्यासाठी सर्व गावकरी गावातील एसटी स्टँडवर एकत्र येणार आहेत. याशिवाय कर्नाटकातून येणाऱ्या अथणी या बसचंही ग्रामस्थांच्या वतीनं पूजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात झळकला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फलक...

सांगलीतील जत तालुक्यातील तिकोंडी गावात काही ग्रामस्थांनी गावात प्रभातफेरी काढून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फलक गावाच्या कमानीवर लावला आहे. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत वादग्रस्त फलक काढला. त्यानंतर कर्नाटकात सामील होण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ठराव घेण्यात येणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावांमध्ये कोणताही विकास झालेला नसल्यानं मराठी भाषिकांमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र सरकार रस्ते, वीज आणि म्हैसाळ योजनेचं पाणी देत नसल्यामुळं स्थानिकांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळं आता सीमाभागातील अनेक गावांनी कर्नाटकात सामील होण्यासाठी ठराव पास करण्याची तयारी सुरू केली आहे.

IPL_Entry_Point