सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन जणांनी बलात्कार केल्यानंतर एका महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात ही घटना घडली. एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी बलात्कार करून याची वाच्याता कुठे केल्यास तिच्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. यानंतर महिलेने गावातील तलावात उडी मारून आपलं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून सुरज नकाते (वय २९), तोसिफ मुजावर (वय २४) आणि शुभम नकाते (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा पती पुण्यात वास्तव्यास आहे. पीडिताही पुण्यातच राहते. हे कुटुंब २८ जुलै २०२४ रोजी मंगळवेढ्यातील त्यांच्या मूळ गावी आले होते. तीन आरोपींपैकी एकजण या कुटूंबाचा नातेवाईक असल्याने तो नेहमी त्यांच्या घरी पुण्याला जात होता. पीडितेचा पती घरी नसतानाही तो जात होता. हा तरुण नात्यातील असल्याने पतीला त्याच्यावर संशय आला नाही. अन्य दोन जण त्याचे मित्र आहेत.
पीडित महिला २१ ऑगस्ट रोजी सकाळी आईला भेटायला जाते म्हणून घरातून निघून गेली होती. मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने तिचा तलावाल बुडून मृत्यू झाल्याचे पतीला सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपली चप्पल व मोबाईल तलावाच्या काठावर ठेवला होता. या मोबाईलमधील कॉल हिस्ट्री तपासल्यानतर समोर प्रकार समोर आला. महिलेस तलावातून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले.
महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासल्यानंतर आरोपी तिला अनैतिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देत असल्याचे समोर आले. तीन जण तिला ब्लॅकमेल करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून तिने तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याचे तिच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान तीनही आरोपींना अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने सुरज नकाते याला तीन दिवस, तोसिफ मुजावर याला दोन दिवस तर शुभम नकाते याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.