मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंढरपूर मतदारसंघातून सलग ७ वेळा खासदार झालेले काँग्रेस नेते संदीपान थोरात यांचे निधन

पंढरपूर मतदारसंघातून सलग ७ वेळा खासदार झालेले काँग्रेस नेते संदीपान थोरात यांचे निधन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 31, 2023 11:22 PM IST

sandipan throat : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा प्रतिनिधीत्व केलेलेकाँग्रेसचेज्येष्ठ नेतेमाजी खासदार संदीपान भगवान थोरात यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

संदीपान थोरात
संदीपान थोरात

Sandipan Throat Passed Away : पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा  प्रतिनिधीत्व केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार संदीपान भगवान थोरात यांचे शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९१ वर्षाचे होते. गेल्या काही वर्षापासून ते सक्रीय राजकारणातून दूर होते. सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अंतिम श्वास घेतला.

संदिपान थोरात यांना हृदयविकारासह पोटाचे विकार आणि श्वसनविकाराने ग्रासले होते. प्रकृती खूपच बिघडल्यामुळे त्यांना ११ मार्च रोजी सोलापुरात एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वृध्द पत्नीसह चार विवाहित पुत्र, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

अनुसूचित जातीतून आलेले आणि गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणून संदीपान थोरात यांची ओळख होती. पेशाने ते वकील होते. त्यांचे मूळ गाव माढा तालुक्यातील निमगाव हे होते. तरूणपणीच काँग्रेसच्या माध्यमातून ते राजकारणात आले. १९७७ साली काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी प्रथम पंढरपूरच्या तत्कालीन लोकसभा राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर थोरात यांनी १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६ आणि १९९८ पर्यंत असे सलग सातवेळा विजय मिळवून पंढरपूर मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व केले होते.

शरद पवार यांनी १९९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पंढरपूरमधून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून रामदास आठवले यांना उतरवले. यात आठवले यांनी थोरात यांचा पराभव केला. तेव्हापासून थोरात सक्रीय राजकारणातून दूर झाले.

IPL_Entry_Point

विभाग