Pandharpur Accident News: सोलापूरमधील पंढपूरजवळ भाविकांच्या खासगी बसला आज पहाटे अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर- टेंभुर्णी महामार्गावर आज पहाटे मालवाहतूक ट्रक आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ८ ते १० जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना पंढरपुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातात मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या भाविकांचे अद्याप नाव समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे.
देशात गेल्यावर्षी १ लाख ७० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. तर, ४ लाख ६३ हजार लोक जखमी झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ४ टक्क्यांनी वाढली आहे. देशात दर तीन मिनिटाला एकाचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासह एकूण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढ रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे, यात उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा यांसारख्या राज्याचा समावेश आहे.
देशात सर्वाधिक अपघाती मृत्युंची नोंद तामिळनाडूत (१८ हजार ३४७) करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात २०२३ मध्ये १५ हजार ३६६ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. तर, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १३ हजार ७९८ आणि १२ हजार ३२१ हजार मृत्युची नोंद झाली. तामिळनाडूत जखमींची (७२ हजार २९२) संख्या मोठी आहे.