मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रात अवघ्या ७ महिन्यात १६ वाघांचा मृत्यू

महाराष्ट्रात अवघ्या ७ महिन्यात १६ वाघांचा मृत्यू

HT Marathi Desk HT Marathi
Aug 05, 2022 07:04 PM IST

गेल्या ७ महिन्यांत महाराष्ट्राच्या जंगलात १६ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व वाघ विदर्भाच्या जंगलात मृत्यूमुखी पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Tiger
Tiger (Ashok Sharma)

एकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘आम्हीच अस्सल वाघ..' हे दर्शवण्यासाठी जोरदार राजकीय कुस्ती रंगलेली असताना जंगलातील खऱ्या वाघांवर मात्र मोठं संकट आल्याचं दिसून येत आहे. अवघ्या ७ महिन्यांत महाराष्ट्राच्या जंगलात १६ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व वाघ विदर्भाच्या जंगलात मृत्यूमुखी पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने (NTCA) जारी केलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी २०२२ ते ५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान १६ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यंदा लगतच्या मध्यप्रदेश राज्यात याच कालावधीत एकूण २७ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एनटीसीएने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, गोंदिया, उमरेड, बुलडाणा, ब्रम्हपुरी, आलापल्ली आणि गडचिरोलीच्या जंगलात या वाघांचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. १६ पैकी फक्त दोन वाघांचा मृत्यू वाघांसाठीच्या संरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या आत झाला असून इतर १४ वाघांचा मृत्यू व्याघ्र प्रकल्पाबाहेर झाला आहे. यातील ९ वाघ नैसर्गिक मृत्यू किंवा आपसांतील लढायांमुळे मृत्युमुखी पडले असून चार वाघ विजेच्या प्रवाहामुळे मरण पावले आहेत. दोन वाघ अपघातात तर एका वाघाची बेकायदेशीर शिकार झाल्याचे उघड झाले आहे. बेकायदेशीर शिकारीची घटना भंडारा जिल्ह्यातील जंगलात उघडकीस आली होती.

राज्यात वाघांच्या संरक्षणासाठी सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी पाच व्याघ्रप्रकल्प हे एकट्या विदर्भात आहेत. ताडोबा (चंद्रपूर), मेळघाट (अमरावती), पेंच (नागपूर), नवेगाव-नागझिरा (भंडारा) आणि बोर (वर्धा) येथे व्याघ्र प्रकल्प आहेत. सहावे, सह्याद्री व्याघ्रप्रकल्प, हे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले असून याचे क्षेत्र सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आहे. या कालावधीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात वन खात्यातील अधिकाऱ्यांच्या उदासीन प्रवृत्तीमुळे विदर्भातील जंगलात वाघांचे मृत्यू वाढत असल्याचं मत वन्यप्राणी विषयाचे अभ्यासक मोहन कोठेकर यांनी सांगितलं. उन्हाळ्यात जंगलात वाघ आणि इतर प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात प्रचंड उन तापत असल्याने जंगलाच्या आत वनाधिकाऱ्यांच्या फेऱ्या कमी होतात. उन्हाळ्यात पाणी पिण्याकरिता वन्य प्राणी रात्री पाणवठ्याच्या ठिकाणी एकवटतात. त्यामुळे या प्राण्यांना लक्ष्य करण्याची शिकाऱ्यांना आयती संधी मिळते. यामुळे वाघांची संख्या कमी होत असल्याचे कोठेकर यांनी सांगितले.

राज्यात २०१२ ते २०२२ दरम्यान एकूण १८४ वाघांचा मृत्यू झाल्याचे एनटीसीएच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

IPL_Entry_Point

विभाग