Sion Road Over Bridge closed for heavy vehicles: वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणाऱ्या, शीव स्थानकावरील अत्यंत महत्वाचा सायन रोड ओव्हर ब्रिज शुक्रवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद असेल. सुरक्षेचा उपाय म्हणून मध्य रेल्वेने अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात आरओबी असुरक्षित असल्याचे घोषित केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याची गरज असून या ब्रिजच्या दोन्ही टोकांवर ३.६० मीटरपर्यंत उंचीचे गेज बसविण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
रस्ता वापरणाऱ्यांसाठी वाहतुकीचे योग्य नियम जारी करावेत, अशी विनंती आम्ही वाहतूक विभागाला केली. सायन ब्रिज खराब अवस्थेत असण्याबरोबरच सीएसएमटी- कुर्ला दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गातही अडथळा ठरत आहे. त्यामुळे तो तोडून त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार होती, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
धारावी, लालबहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा सायन ब्रिज हा महत्त्वाचा दुवा असून तो बंद केल्याने पूर्व-पश्चिम वाहतूक विस्कळीत होईल. कुर्ल्यामार्गे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावे लागेल. जानेवारीपासून मध्य रेल्वेने पूर्ण नियोजन करूनही सायन ब्रिजचे शटडाऊन तीन वेळा पुढे ढकलण्यात आले.
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग टाकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांचे पृथक्करण होण्यास मदत होईल. अतिरिक्त रेल्वे मार्गांना सामावून घेण्यासाठी सायन ब्रिजमधील गर्डरची व्याप्ती सध्याच्या ३० मीटरवरून ४९ मीटर पर्यंत वाढविणे आवश्यक आहे.
सायन रोड ओव्हर ब्रिज जानेवारी महिन्यातच पाडण्यात येणार होता. परंतु, स्थानिक लोक आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला विलंब झाला. यानंतर २८ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून सायन रोड ओव्हरब्रिज तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे या तारखेत बदल करण्यात आला. त्यावेळी २८ मार्च रोजी हा पूल पाडण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु,तिसऱ्यांदा सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचे काम पुढे ढकलले.
संबंधित बातम्या