Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : भारतीय नौदलानिमित्त सिंधुदुर्ग येथील मालवण येथे उभारण्यात आलेला किल्ला सोमवारी कोसळला. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर मोठी टीका सुरू केली आहे. कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. या प्रकरणी जयदीप आपटे याला अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर आता जयदीप आपटे फरार झाला आहे. त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जयदीप आपटे याला कधी अटक होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
भारतीय नौदल दिनी मालवण येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग येथील राजकोट तटावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याची घाई घाईत उभारणी करण्यात आली होती. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात अकळे होते. मात्र, सोमवारी हा पुतळा कोसळला. हवेमुळे हा पुतळा कोसळला असे कारण देण्यात आले आहे. मात्र, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. महायुती सरकारमधील निकृष्ट कामाचे हे प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच या कामात मोठा भ्रष्टाचार हल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी ठेकेदार व शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयदीप आपटे याला पोलिस कधीही अटक करण्याची शक्यता आहे. मात्र, ही घटना घडल्यावर जयदीप आपटे फरार असल्याची माहिती आहे. त्याच्या कल्याण येथील घराला कुलूप असल्याची देखील माहिती आहे.
मिळलेल्या माहितीनुसार जयदीप आपटे याला पुतळा उभारण्याचा जास्त अनुभव नसतांना देखील राजकोट तटावर २८ फूटी ब्राँझचा महाराजांच्या पुतळा उभारण्याचे काम दिले होते. जयदीप आपटेला फक्त दोन फुटांपर्यत पुतळे साकारण्याचा अनुभव आहे. असे असतानाही जयदीप आपटेला शिवरायांचा इतका मोठा पुतळा उभारण्याचे कंत्राट का देण्यात आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या पुतळ्याचे काम मिळाल्यावर जयदीप आपटे याने केवळ सहा ते सात महिन्यांमध्ये शिवरायांचा हा पुतळा तयार केला. या कामापूर्वी जयदीप आपटेला मोठ्या उंचीचे पुतळे तयार कोणताही अनुभव नव्हता. जयदीप आपटेला हा पुतळा उभारणीचे काम कोणत्या निकषांवर देण्यात आले ? असा प्रश्न शिवप्रेमींनी केला आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नौदलाला २ कोटी ३६ लाख रुपये दिले होते. मात्र, कलाकारांची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केली. जयदीप आपटेला हा पुतळा तयार करण्याची ऑर्डर ही ८ सप्टेंबर २०२३ रोजी देण्यात आली होती.
मालवण येथील कोसळलेला पुतळा हा कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे याने केला. जयदीप आपटे हा केवळ २५ वर्षांचा तरुण आहे. शिल्पकार सदाशिव साठे यांच्याकडून त्याला शिल्पकार होण्याची प्रेरणा मिळाली. तो आठवीत असताना त्याने कला क्षेत्र निवडले होते. जयदीपचे आई-वडील दोघेही नोकरी करत असून जयदीपचे दहावीपर्यंतचे शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये झाले. त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका व जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिल्पकलेचा डिप्लोमा केला आहे.