सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोणपाल- सोनुर्ली येथील घनदाट जंगलात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे जंगलात ५० वर्षाच्या महिलेला लोखंडी साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आले होते. महिलेजवळ अमेरिकेचा पासपोर्ट आढळून आला आहे. त्याचबरोबर तिच्याकडे एक आधारकार्ड मिळाले असून त्यावर तामिळनाडूतील पत्ता आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी सोनुर्ली गावाजवळील जंगलात एक गुराखी गुरे चारण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला एका महिलेचा जोर-जोरात ओरडण्याचा आवाज आला.आवाजाच्या दिशेनेजात गुराख्याने शोध घेतला असता एका झाडाला महिलेला साखळदंडाने बांधलेले दिसून आले. हे पाहून तो घाबरला व याची माहिती ग्रामस्थ तसेच पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल केले.
सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कटावणीच्या साह्याने साखळदंड तोडून महिलेला मुक्त केले.गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही महिला पावसात भिजली होती त्यामुळे तिच्या हातापायांना सुज आली होती.तिला आवाज फुटत नव्हता. महिलेचापाय सुजला होता. बाकी अंगावर कुठेही जखमनव्हती.
महिलेची शारीरिक आणि मानसिक स्थिती पाहून तिला गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी सांगितले की, तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डॉक्टरांनी सांगितले की, तिची मानसिक स्थिती चांगली नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेकडे अमेरिकेचा पासपोर्ट मिळाला आहे. महिलेचे नावललिता कायी कुमार एसअसे आहे. त्यांचा व्हिसा एक्सपायर झालेला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या नागरिकत्वाचा शोध घेतला जात आहे. गेल्या १० वर्षापासून महिला भारतात रहात आहे. जेथे तिला बांधून ठेवले होते, तेथे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून तिने काहीही खाल्ले नाही. ती किती दिवसापासून झाडाला बांधून आहे, हे समजू शकलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला संशय आहे की, तामिळनाडूत राहणाऱ्या महिलेच्या पतीनेच तिला येथे बांधले असावे व पसार झाला असावा. पोलिसांची पथके तामिळनाडू, गोवा आणि अन्य ठिकाणी रवाना करण्यात आली आहे, जेणेकरून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जाईल.