मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जमलेल्या लोकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यात अनेक जण जखमी झाले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी भन्नाट शक्कल लढवली. लोकांनी पीपीई किट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात घडली आहे.
मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जमलेले लोक मृतदेह सोडून सैरावैरा पळू लागले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे या प्रश्न लोकांना पडला. अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले गेले. या घटनेनं वैभववाडी तालुक्यात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार वैभववाडी तालुक्यातील तिथवली महंमदवाडी गावातील पांडुरंग कृष्णा हरयाण (वय ७०) यांच वृद्धापकाळानं बुधवारी रात्री निधन झाले. ते शेतकरी होते. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या मृतदेह नागरिकांनी घरातून स्मशानभूमीत आणला. अंत्यसंस्कासाठी ६० ते ७० लोक आले होते. अंत्यसंस्काराचे विधी सुरू करण्यापूर्वी नागरिक तेथील वाळलेली लाकडं तोडून धूर करत होते.
मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता. तेथील एका ऐनाच्या झाडावर मधमाशांचं पोळं होतं. लाकडं पेटवून केलेला धूर मधमाशांच्या पोळ्याकडे जाताच मधमाशा पोळ्यावरून उठल्या व आक्रमक होत स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेनं सैरावैरा पळत सुटले. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंघावत होत्या.
मधमाशांनी लोकांचा स्मशानभूमीपासून एक किमी अंतरापर्यंत पाठलाग केला. मधमाशा लोकांना मृतदेहाजवळ जाऊ देत नव्हत्या. लोकं मधमाशा जाण्याची वाट पाहत होतं. मात्र मधमाशा तेथून हटत नव्हत्या. अखेर लोकांनी लोकांनी अडीच तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट आणले व मृत पांडुरंग हरयाण यांच्या मुलानं पीपीई किट घालून अंत्यविधी पूर्ण केले. यावेळी अन्य चार ते पाच लोकांनी पीपीई कीट घालून स्मशानभूमीत जाऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. काही जण हेल्मेट घालून स्मशानभूमीत उपस्थित होते.
संबंधित बातम्या