Fishing Boat Capsizes In Vengurla Port: अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत बचावकार्यदरम्यान एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला. या घटनेला दिवस उलटला नाही तोच, सिंधुदुर्गात बर्फ घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना समोर आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण अजूनही बेपत्ता असल्याचे समजत आहे. त्यांचा शोध सुरू आहे. वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वेंगुर्ला बंदरात रात्री मच्छिमारांना लागणारा बर्फ घेऊन जाताना बोट उलटली. या बोटमध्ये एकूण सात जण होते. यातील तिघांनी पोहून किनारा गाठला. तर, दोन जणांचा बुडून मृत्यू झाला असून इतर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. वेंगुर्ला बंदरात शोध मोहिम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळ माजली आहे.
नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. त्यानंतर इंदापूरच्या उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरमध्ये काल बचावकार्य सुरू असताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या घटनेत तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या तिन्ही घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले असताना सिंधुदुर्गातील घटनेने यात आणखी भर टाकली.
उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावात बुधवारी (२२ मे २०२४) दुपारी घडली. आर्यन संतोष नवले (वय, १३) आणि आयुष संतोष नवले (वय, १०) असे अशी मृतांची नावे आहेत. आर्यन आणि आयुष हे दौंड तालुक्यातील राहु येथील रहिवाशी आहेत. पण ते सुट्टीनिमित्त पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास दोघेही बापू जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या शेततळ्याजवळ गेले आणि पोहता येत नसून दोघांनी पाण्यात उडी मारली, असे समजत आहे.