राज्यभरात सोमवारी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच सिंधुदुर्गातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या खलाशांची बोट उलटल्याने समुद्रात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून चार जण प्रवास करत होते. मात्र, समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडावर आपटून उलटली आणि चारही जण समुद्रात बुडाले. यातील एकजण पोहत किनाऱ्यावर आल्याने बचावला तर तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडावर आपटली व बोटीत पाणी येऊ लागले. बोट समुद्रात पलटी झाल्याने बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खलाशांचा बुडून मृत्यू झाला.
मृतांमध्ये नौकामालक व सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम उर्फ जीजी आडकर, प्रसाद भरत सुर्वे (वय ३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (वय ५३, रा. मोर्वे देवगड) यांनी पोहत येऊन सुरक्षित किनारा गाठला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौकेससह मच्छिमारीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत अन्य तीन खलाशी होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते किनारी माघारी परतत होते. रविवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका दगडावर आदळली व हेलकावे खाऊ लागली. नोकेत पाणी भरू लागल्याने जीव वाचविण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या मारल्या. मात्र यात तिघांचा बुडून मृत्यू झाला.
आज सोमवारी पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदरा नजीकच्या समुद्रातून पोहत येताना दिसून आले. तर अन्य तिघे मच्छिमार बेपत्ता होते. सकाळच्या सुमारास हिर्लेवाडी व वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडले. विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा परसरली आहे.
नारळी पौर्णिमेनिमित्त आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला. समुद्रामध्ये असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामधून सोन्याचा नारळ प्रथम समुद्राला अर्पण केला जातो, त्यानंतर समस्त जिल्हावासीय ठीक-ठिकाणी समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे.