Congress targets Abdul Sattar : गौतम पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीमार करण्याचे आदेश देणारे व गलिच्छ भाषा वापरणारे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार वादात सापडले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर हल्ला चढवला आहे. सत्तेची मस्ती दाखवणाऱ्या सत्तारांना जनताच घरी बसवेल, असा संताप काँग्रेसनं व्यक्त केला आहे.
वाढदिवसाच्या निमित्तानं सत्तार यांनी स्वत:च्या सिल्लोड मतदारसंघात गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. आपल्या कार्यक्रमात गोंधळ होत असल्याचं पाहून सत्तार संतापले व त्यांनी पोलिसांना थेट लाठीहल्ला करण्याचा आदेश दिला. पोलिसांनीही लाठीहल्ला केला. इतकंच नव्हे, सत्तार यांनी तरुणांना उद्देशून शिवीगाळही केली. ‘या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडे मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून ५० हजार लोकांना मारायला काय हरकत आहे?, असंही सत्तार म्हणाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सत्तार यांचा चांगलाच समाचार घेतला. 'भाजपप्रणित शिंदे सरकार आल्यापासून सत्ताधारी मंत्री, आमदार, खासदार यांचा मस्तवालपणा वाढला आहे. महाराष्ट्राचे पोलीस मंत्र्याच्या वाढदिवसाच्या बंदोबस्तासाठी आहेत का? अब्दुल सत्तारांची भाषा पाहता ते मंत्रीपदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत पण अशा मुजोर मंत्र्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात नाही, अशी टीका लोंढे यांनी केली.
'मंत्री अब्दुल सत्तार हे वादग्रस्त आहेत, टीईटी घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. ३७ एकर गायरान जमीन घोटाळा, कृषी मंत्री असताना बोगस धाडी टाकून वसुली करण्यात सत्तारांच्या पीएचं नाव समोर आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबतही सत्तारांनी गलिच्छ भाषा वापरली होती. अब्दुल सत्तार हे नेहमीच त्यांची सत्तेची मस्ती दाखवून देतात, पण आता अशा मुजोर, मस्तवाल सत्तारांना घरी बसवून जनताच त्यांची सत्तेची मस्ती उतरवेल, असा इशारा लोंढे यांनी दिला.
‘अय पोलीसवाले लाठीचार्ज करा. त्यांना कुत्र्यासारखं मारा. इतकं मारा की त्यांची हाडं तुटतील. मारा त्यांना. हाणा… दोन मिनिटांत सरळ होतील. साल्या तुमच्या बापानं कधी असा कार्यक्रम पाहिला होता का? तू राक्षस आहेस का? माणसाची औलाद आहे, जागेवर बसून माणसासारखा आनंद घ्या. खाली बसलात तरच कार्यक्रम होईल नाहीतर नाही. तुझ्या घरी असाच उभा राहतो का? तुझ्या आई वडिलांचा पिक्चर बघतो का? खाली बस, यांना दुसरी भाषा कळतच नाही,’ असं सत्तार म्हणाले होते.