Shrikant Shinde Post For Eknath Shinde: राज्यात विधानसभा निवडणुकांत महायुतीला मोठा विजय मिळाला. विधानसभेचा कालावधी संपला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू स्पष्ट केली. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी वडील एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक्सवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी बाबा मला तुमचा अभिमान वाटतो असे लिहिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात २८८ पैकी २३६ जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी शिंदे यांची इच्छा होती. मात्र, भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने काळजावाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहा मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
श्रीकांत शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, बाबा मला तुमचं खूप अभिमान वाटतो. एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.
सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. जनतेतला मुख्यमंत्रि म्हणून ओळख मिळायला नशीब लागतं असं म्हणत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.