Honey Bee Attack In Nashik : नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळ शितकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या पर्यटकांच्या समूहावर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना रविवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत काही पर्यटक जखमी झाले आहे.
इगतपूरी व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेरील जंगलात तब्बल ३५० फूट उंचीचा शितकडा धबधबा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी काही ग्रुप रॅपलिंग करत असून या साठी एक गट हा येथे रविवारीगेला होता. सर्व पर्यटक हे कल्याण, गुजरात व काही दक्षिणेकडील राज्यातील होते. रविवारी दुपारी ते रॅपलिंगला सुरुवात करणार होते. यासाठी सर्व तयारी सुरू असतांना व्हिडिओ काढण्यासाठी ड्रोन उडवण्यात आले. यावेळी येथील एका झाडावरील मधमाशांचे मोठे मोहोळ उठले व त्यांनी या पर्यटकांवर हल्ला केला.
रॅपलिंगसाठी आलेल्या या ग्रुपमध्ये ५० पेक्षा अधिक पर्यटक होते. यात लहान मुले आणि महिला देखील होत्या. दुपारीच्या सुमारास हे सर्व जण धबधब्या मुखाजवळ पोहोचले. यावेळी ड्रोन उडवल्याने मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. अचानक मधमाशा चावू लागल्याने मोठा गोंधळ उडाला. पर्यटक एकमेकांना शांत आणि जमिनीवर झोपण्यास सांगत होते. मात्र, मधमाशा चावत असल्याने काही जण पळत सुटले होते. या घटनेचा व्हिडिओ या ग्रुपमधील काहींनी काढला. यात २० ते २५ पर्यटक जखमी झाले आहेत.
या ग्रुपचे प्रशिक्षक जयस्वार यांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना डंख केल्याने ते देखील या घटनेत जखमी झाले. हा व्हिडिओ काहींनी सोशल मिडियावर शेअर केला असून यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. निसर्गाशी खेळ केल्यावर असेच होणार असे काहींनी म्हटले आहे. दरम्यान, जखमींवर खाली गावात जाऊन उपचार करण्यात आले.