nirodha gutkha found in samosa in Pune Pimpri-Chinchwad : पुण्यात पिंपरी-चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एमआयडिसी परिसरातील एका मोठ्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोस्यात निरोध आणि गुटखा आढळल्याने खळबळ उडाली आहे. व्यावसायिक स्पर्धेच्या इर्षेतुन ही घटना घडल्याचे पुढे आले असून या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिखली येथे २७ मार्च रोजी घडली होती. रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिरोज शेख उर्फ मंटू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रहीम शेख, अझर शेख, मझर शेख (रा. मोरवाडी), विकी शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार शंकरराव देसाई यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेचे वृत्त असे की, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कंपनीत कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थ पुरविण्याचा करार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला आहे. दरम्यान, देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथे असणाऱ्या मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उप कंपनीकडून सामोसा घेत होते. याचा करार देखील करण्यात आला होता. मात्र एसआरएस एंटरप्रायझेसने कंपनीला दिलेल्या सामोस्यात प्रथमोपचार पट्टी आढळली होती. त्यामुळे देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीने हा करार रद्द करत कंपनीकडून समोसा घेणे बंद केले होते.
दरम्यान, देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स कंपनीने सामोसा पुरविण्यासाठी दुसरी कंपनी मे. मनोहर एंटरप्रायझेस सोबत करार केला. मात्र, ही बाब 'एसआरएस एंटरप्रायझेस'ला पटली नाही. त्यामुळे देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीची प्रतिष्ठा खराब व्हावी व त्यांचे अन्न पदार्थ पुरवण्याचे कंत्राट रद्द व्हावे या हेतूने 'एसआरएस एंटरप्रायझेस'चे मालक रहीम शेख, अझर शेख व मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज, विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवले.
आरोपी रहीम, अझर व मझर यांच्या सांगण्यानुसार फिरोज व विकी यांनी समोसा तयार करतांना काहीत निरोध तर काहीत दगड, व विमल पान मसाला तंबाखूजन्य गुटखा पदार्थ टाकले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणी कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीचे देसाई यांनी पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी फिरोज याला या प्रकरणी अटक केली असून यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या घटनेची माहिती अन्न प्रशासनाला माहिती दिली असून समोस्यात दगड, निरोध, गुटखा टाकून कामगरांच्या जीवाशी खेळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या