Pune Urulikanchan news : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील ऊरुळी कांचन जवळील खामगाव टेक (ता. हवेली) येथे शुक्रवारी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या वेळी एक वीज कडाडली. या विजेच्या आवाज ऐकून तीन महिला बेशुद्ध पडल्या. यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
अंजना बबन शिंदे (वय ६५ रा. शिंदवणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुनीता महादेव डोंगरे (वय ५६), संध्या गाडेकर (वय ४५, दोघी रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) या बेशुद्ध पडल्या. याबाबत मिळालेली माहिती अशी की, उरुळी कांचन व शिंदवणे येथे काही महिला या शुक्रवारी शेतीच्या कामासाठी खामगाव टेक येथे गेल्या होत्या. शेतातील कामे आटोपून त्या घरी येत होत्या. मात्र, घरी येत असतांना अचानक पावसाळी वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी त्या शेतात एका आडोशाला थांबल्या. या महिला ज्या ठिकाणी थांबल्या होत्या. त्याज्या काही अंतरावर एक मोठी वीज कडाडली. या विजेच्या आवाजाने अंजना शिंदे यांच्यासह सुनीता महादेव डोंगरे (वय ५६), संध्या गाडेकर (वय ४५, दोघी रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना खाजगी वाहनातून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ३ महिलांना तपासल्यानंतर अंजना शिंदे यांना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तर, बाकी दोघींना उपचार करून सोडून देण्यात आले. दरम्यान, खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंजना शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पावसासोबत वादळी वारे देखील वाहत असल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात तरकारी पिकांचे मोठे उत्पादन होते. या पिकांना देखील मोठा फटका पावसामुळे बसला आहे. दरम्यान, आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या