Suspicious Material in Jalna Zp School : देशात महाराष्ट्र राज्य सर्व बाबतीत आघाडीवर आहे. पुरोगामी महाराष्ट्र ओळख असलेल्या राज्यात सोमवारी दोन धक्कादायक घटना घडल्या. जालण्यातील एका शाळेत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यार्थी चांगलेच घाबरले आहेत. शाळेच्या आवारात कुणी तरी लिंबू मिरची हळद कुंकू वाहून बाहुली ठेवल्याचे पाहून विद्यार्थी घाबरून पळून गेले. शाळेत केलेल्या जादूटोण्याच्या या प्रकारामुळे गावात देखील उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
जालना जिल्ह्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला. कुणी तरी अज्ञात व्यक्तिने शाळेच्या आवारात बांगड्या, हळदी-कुंकू आणि बाहुली ठेवत अघोरी कृत्य केलं. विद्यार्थी जेव्हा शाळेत आले तेव्हा हा प्रकार पाहून ते घाबरले. याची माहिती शाळा प्रशासनाला देण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. गडदे यांनी. आरोपीने वर्गखोल्यात देखील हळद-कुंकू वाहिलेली बाहुली ठेवली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मुले वर्गात आली असता त्यांना वर्गातील बाकांवर हळद-कुंकू, बांगड्या वाहिलेली बाहुली दिसली. हा प्रकार आधी नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिसला. या मुळे विद्यार्थी गोंधळले व घाबरून पळत जाऊन याची माहिती वर्गशिक्षकांना दिली. ही घटना संपूर्ण गावात पसरली असून या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला आहे.
गोंदि शाळेत काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही लावण्यात आले होते. मात्र, ही सीसीटीव्ही चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटनेमुळे सध्या गावात दहशतीचे वातावरण आहे.
धाराशिव जिल्ह्यात देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या सीमेवर अंधश्रद्धेच्या माध्यमातून लिंबू, बांगड्या, कुंकू, बाहुली, दाबन अन् गव्हाच्या पिठाची गळ्यात मंगळसूत्र असलेली बाहुली सापडली. ही घटना खेड आणि उपळा गावच्या वेशीवर एका जागेवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.