मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Nagar: संभाजीनगरात हिटरचा शॉक लागल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, ३ दिवसानंतर होतं लग्न!
Electric Shock (Representative Image)
Electric Shock (Representative Image)

Sambhaji Nagar: संभाजीनगरात हिटरचा शॉक लागल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, ३ दिवसानंतर होतं लग्न!

24 March 2023, 13:23 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Sambhaji Nagar Shocking: लग्नाच्या तीन दिवसापूर्वीच हिटरचा शॉक लागल्याने भावी नवरीचा मृत्यू झाला आहे.

Sambhaji Nagar News: लग्नाच्या तीन दिवसांपूर्वीच एका १८ वर्षीय तरूणीचा हिटरचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनरात गुरूवारी (२३ मार्च २०२३) सकाळी घडली आहे. येत्या रविवारी (२६ मार्च २०२३) संबंधित तरुणीचे लग्न होते. घरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोहिणी उर्फ पल्लवी भगवान जाधव, असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. रोहिणी ही आई-वडिलांसह सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द गावात राहायला होती. दरम्यान, गुरूवारी सकाळी अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली. गरम पाणी घेत असताना हिटरचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच मृत रोहिणीचा साखरपुडा झाला होता. शुक्रवारी सकाळी तिच्या अंगाला हळद लागणार होती. तर,रविवारी तिचे लग्न होते. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचा वातावरण होतं. लग्नाच्या पत्रिकाही पाहुण्यांना वाटून झाल्या होत्या. याशिवाय, लग्नाचा बस्ता, मंडप, वाजंत्री जेवणाची व्यवस्था पूर्ण झाली होती. जवळच्या पाहुण्यांची घरी येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यापूर्वी काही तास अगोदर रोहिणीने जगाचा निरोप घेतल्याने सर्वांना मोठा धक्का लागला आहे.