मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवाजी पार्क’साठी रस्सीखेच; ठाकरे गट व मनसेचा एकाच दिवशी अर्ज अन् सभांची तारीखही एकच, इनवर्ड नंबरमुळे निघणार तोडगा?

शिवाजी पार्क’साठी रस्सीखेच; ठाकरे गट व मनसेचा एकाच दिवशी अर्ज अन् सभांची तारीखही एकच, इनवर्ड नंबरमुळे निघणार तोडगा?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 01, 2024 05:21 PM IST

Shivaji Park : सभेसाठी शिवाजी पार्क मैदाना मिळावे याासाठी दोन्ही पक्षांचे अर्ज एकाच दिवशी महापालिकेला प्राप्त झाल्याने तसेच एकाच तारखेला सभा असल्याने मैदान कोणाला द्यायचे याचा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याचा फैसला इनवर्ड नंबरवरून केला जाणार आहे.

शिवाजी पार्कसाठी ठाकरे गट व मनसेमध्ये रस्सीखेच
शिवाजी पार्कसाठी ठाकरे गट व मनसेमध्ये रस्सीखेच

लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता तापू लागलं आहे. प्रचार सुरू झाला असला तरी मोठ्या नेत्यांच्या सभा अजून सुरू झालेल्या नाहीत. त्यातच आता विविध पक्षांकडून प्रचार मोहिमेचं नियोजन सुरू केले असून मैदाने मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गट व मनसेनं शिवाजी पार्कवर सभा घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाकडून एकाच दिवशी अर्ज करण्यात आला असून सभांची तारीखही एकच आहे. यामुळे या मैदानासाठी संघर्ष पाहायला मिळत आहे.

दोन्ही सभा एकाच दिवशी असल्यानं शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार, याची उत्सूकता लागली आहे. मात्र मैदान कोणाला द्यायचे याचा महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

लोकसभा प्रचारासाठी मनसेकडून १७ मे रोजी जाहीर सभेचे आयोजन केले असून या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र त्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटानेही शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी पालिकेकडे शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांच्या सभांची तारीख एकच असून त्यांनी एकाच दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी महापालिकेकडे अर्ज केला आहे.

दोन्ही अर्ज एकाच दिवशी प्राप्त झाल्याने तसेच एकाच तारखेला सभा असल्याने मैदान कोणाला द्यायचे याचा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याचा फैसला इनवर्ड नंबरवरून केला जाणार आहे. १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं बीएमसीने दिलेल्या इनवर्ड नंबर वरून दिसत आहे. यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असल्याचा विश्वास मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क मैदान वर्षातील ३९ विशिष्ट दिवस सोडून अन्य दिवशी जाहीर सभांसाठी देण्यात येत असते.

शिवाजी पार्कसाठी दोन पक्षांमधीस संघर्ष नवा नाही. याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही अशाच प्रकार शिवसेना व मनसेमध्ये चढाओढ लागली होती. दोन्ही पक्षांनी यासाठी अर्ज केले होते. मात्र त्यावेळीही मनसेने पहिल्यांदा अर्ज केल्याने सभेसाठी त्यांना मैदान दिले होते. आता १७ मे रोजी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार की, राज ठाकरेंची तोफ धडाडणार, याची उत्सुकता आहे.

 

त्याआधी ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा शिवतीर्थीवर होत आहे. राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन घेतलेली अजिम शहांची भेट व त्यांच्या महायुतीत सामील होण्याच्या होत असलेल्या चर्चा, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पाडवा मेळाव्यातून काय घोषणा करणार याची उत्सुकता आहे.

IPL_Entry_Point