मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला विराट मोर्चा, महाराष्ट्राची शक्ती दाखवू – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला विराट मोर्चा, महाराष्ट्राची शक्ती दाखवू – उद्धव ठाकरे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 05, 2022 08:38 PM IST

mahavikas aghadi morcha : राज्यपालांची महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये, कर्नाटककडून महाराष्ट्रातील गावांवर करण्यात येणारा दावा तसेच सत्ताधाऱ्यांकडून महिला नेत्यांवर अश्लील शेरेबाजी याविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीचा मोर्चा
महाविकास आघाडीचा मोर्चा

मुंबई -  राज्यापाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले व अन्य महापुरुषांविषयी बेताल वक्तव्ये. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रद्रोही विधाने, सीमाप्रश्नी इतर राज्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांच्या कटकारस्थानास राज्य सरकारची फूस असणे. सत्ताधारी नेत्यांची महिला व अन्य नेत्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये तसेच महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेऊन राज्यातील तरुणांची फसवणूक केल्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का सागला असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून त्याविरोधात आता येत्या १७ डिसेंबर रोजी भायखळ्यातील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धोक्यात आली आहे.  राज्यपाल महापुरुषांवर बेताल वक्तव्ये करत आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला जात आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आणि गावे आता कर्नाटकला नेणार का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

राज्यपाल कोश्यारींना पदमुक्त केलं तरी हा मोर्चा होणारच, असा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. हा विषय केवळ राज्यपालांच्या वक्तव्याचा नाही तर राज्यात आता नवीन सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे, हे या आधी कधीही घडलं नव्हतं असं अजित पवार म्हणाले.

WhatsApp channel