Shiv Sena UBT समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. उद्घाटनानंतर वर्षभरातच छत्रपती संभाजीनगरजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ रस्त्यावर ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेही समृद्धी महामार्गाच्या निकृष्ट कामावरून सरकारला टोला लगावला आहे. रस्त्यांची अवस्था बकाल, खोके गद्दार मालामाल, अशी पोस्ट ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नुकतीच एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, " रस्त्यांची अवस्था बकाल, खोके गद्दार मालामाल! सातत्याने राज्यातील महामार्गांचा खालवलेला दर्जा हे खोके सरकारच्या निष्क्रिय कामगिरीचं फळ आहे. राज्यातील महामार्गावर पडलेले खड्डे, रस्त्यांची उडालेली चाळण ह्यामुळे कित्येकांना सामान्य लोकांना आपले जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. कोट्यावधी रुपये उधळूनसुद्धा हा प्रश्न सुटत नसेल तर हे मिंधे सरकार फक्त स्वतः मालामाल होतंय आणि सामान्य जनतेला मात्र मृत्यूच्या खाईत लोटले जातेय."
नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलोमीटरचा आहे. यापैकी आतापर्यंत ६२५ किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल २० वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते बांधकाम कंपनी एमएसआरडीसीने केला होता. मात्र, हा दावा एका वर्षातच खोटा ठरला. परंतु, पहिल्याच पावसात समृद्धी महामार्गावर अशी दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी डोक्यावर हात मारला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हणाले की, समृद्धी महामार्ग हा मृत्युचा सापळा बनला आहे, जिथे रोज लोकांचे जीव जात आहेत. समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. परंतु, या सरकारला त्याची काळजी नाही. हे सरकार निर्लज्ज सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
समृद्धी महामार्गच्या प्रोजेक्टमध्ये शासनाचे २० हजार कोटी रुपये अतिरिक्त काढले गेले. यातून काही मंत्री आाणि अधिकाऱ्यांना लाभ झाला, असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
संबंधित बातम्या