राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतले.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवसस्थान वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वायकर रविवारी सायंकाळी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावान समजल्या जाणाऱ्या आमदाराने साथ सोडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर म्हणाले गेल्या ५० वर्षापासून मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेलं आहे. चार वेळा नगरसेवक, तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मी आता पक्षप्रवेश करतोय, त्या मागचं कारण वेगळ आहे. देशात भाजपची सत्ता असून पंतप्रधान मोदी तसेच राज्यात मुख्यमंत्री शिंदे चांगलं काम करत आहेत. सर्व विकासकामांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी इकडे आलोय. नाही सोडवले तर, मग मी लोकांना उत्तर देऊ शकणार नाही. यासाठीच मी येथे आलो आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रवींद्र वायकर यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही चौकशी सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर वायकर ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर रवींद्र वायकर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.