Shivsena UBT : मनसेविरोधात उद्धव ठाकरेंची नवी चाल, दीपोत्सवावरून आयोगाकडे तक्रार; निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena UBT : मनसेविरोधात उद्धव ठाकरेंची नवी चाल, दीपोत्सवावरून आयोगाकडे तक्रार; निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?

Shivsena UBT : मनसेविरोधात उद्धव ठाकरेंची नवी चाल, दीपोत्सवावरून आयोगाकडे तक्रार; निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?

Oct 31, 2024 07:08 PM IST

Shivsena Thackeray Vs MNS :उद्धव ठाकरे गटाकडून अमित ठाकरेंविरोधात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे अमित ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?
निवडणुकीआधीच अमित ठाकरे अडचणीत?

विधानसभा निवडणुकीसाठी प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निवडणुकीत रंगत आली आहे. राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असतानाच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या सुरुवातीलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे माहिम मतदार संघातून आपली पहिलीच निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या एका कृतीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया..

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांना याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून अमित ठाकरेंविरोधात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगमजी यांची भेट घेऊन याबाबत तक्रार दिली आहे.

छत्रपती शिवाजी पार्क, दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीबाबत तसेच या कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा,या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

काय आहे पत्रात?

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं असून त्यात म्हटलं आहे की,“महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून ‘दीपोत्सव’ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी मनसेकडून सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे.

 

तसेच या कार्यक्रमाच्या उद्घटनासाठी स्थानिक माहिम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे उपस्थित होते. यामुळे नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहिम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा”,अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सख्त कारवाईचे निर्देश द्यावेत”, अशी मागणीही पत्राद्वारे त्यांनी केली.

Whats_app_banner