राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून अनेक बडे नेते महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मोदींनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरूनही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे.
पहिल्यांदा सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान मोदी आले. सरन्यायाधीशांचे मी आभार मानतो, कारण मोदी घरी येणार म्हणून गणपतीला त्यांनी पुढची तारीख दिली नाही'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.खरी शिवसेना कुणाची तसेच धनुष्यबाणावर कुणाचे नाव याची सुनावणी सतत लांबणीवर जात असल्याने उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे शिवसंवाद मेळाव्यात बोलताना त्यांनी मोदींच्या गणेश दर्शनावर टोला लगावला.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी होत असलेल्या महाअधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महायुती आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जबरदस्त टीका केली. आईसारख्या शिवसेनेवर वार केले,त्यांच्यावर जनता कसा विश्वास ठेवणार, असा सवाल करत आता हे विश्वासघातकी सरकार घालवून आपले सरकार आणण्याची गरज आहे. ही बदलाची ताकद तुमच्यात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आपले सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू करण्याचा शब्दही ठाकरेंनी यावेळी दिला.
माझं मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही नाही. मी सत्तेतून रिटायर होणार नाही. मला सत्तेतून रिटायर कोणीही करु शकत नाही. जोपर्यंत तुम्ही सोबत आहात,तोपर्यंत मला कोणीही रिटायर करु शकत नाही,असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्ता येते जाते, गेलेली सत्ता परत येते आणि आलेली सत्ता जाते. आता आपली सरकार नक्की येणार, खेचून आणणार आणि तुम्हाला मी न्याय देणार आहे. त्यामुळे एकजूट ठेवा. फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झालं ते तुमच्यासोबतही होईल. यांना पेन्शन नाही, टेन्शन द्यायला हवं. उपोषणाची हाक दिली पण ते करू नका.
आपलं आंदोलन असं असायला हवं की हे सत्तेशिवाय उपाशी राहायला हवेत,हा निर्धार करा. आंदोलन पेटल्यानंतर चमच्यांना पाणी ओतायला देऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो की ही तुमची योजना आपण सर्व मिळून अमलात आणल्याशिवाय राहायचं नाही. निवडणूक होईपर्यंत ज्यांना बहीण आहे हे माहिती नव्हतं त्यांनी एकदम लाडकी बहीण आणली, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.