विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस पक्षाचा अतिआत्मविश्वासामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करायला हवे होते, असं दानवे यांनी म्हटलं आहे. मात्र कॉंग्रेस नेतेच स्वतः सूट बूट घालून मुख्यमंत्रीपदावर बसण्यासाठी तयार होते, अशी टीका दानवे यांनी केली. कॉंग्रेसच्या या प्रवृत्तीचा प्रचारादरम्यान नकारात्मक परिणाम झाला आणि महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला, असं दानवे म्हणाले.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने विधानसभेच्या २८८ जागांपैकी २३० जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना- ठाकरे गटाचा एकूण ४६ जागांवर विजय झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हरयाणा आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस पक्ष हा अतिआत्मविश्वासी होता. त्याचेच प्रतिबिंब निकालात उमटले. जागावाटपाच्या वाटाघाटींदरम्यान कॉंग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेनेलाही फटका बसला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करायला हवे होते. तसे झाले असते तर निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे आमचेही नुकसान झाले आहे, असं दानवे यांनी म्हटले आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी करत महाराष्ट्रात १३ जागा जिंकल्या होत्या. महाविकास आघाडीच्या इतर मित्रपक्षांना मिळालेल्या जांगापैकी सर्वाधिक जागा कॉंग्रेसला मिळाल्या होत्या. लोकसभेतील यशाच्या आधारवर काँग्रेसने विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेत सौदेबाजी करत सर्वाधिक १०६ जागा मिळवल्या होत्या. जागावाटपादरम्यान महाविकास आघाडीत जोरदार कलह झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. १०३ जागा लढूनही कॉंग्रेसला केवळ १६ जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान, शिवसेनेने ८९ जागा लढवून २० जागा जिंकल्या तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने ८७ जागा लढवून १० जागा जिंकल्या आहेत.
कोणत्याही एका पक्षाचे नाव न घेता दानवे म्हणाले, ‘शिवसेनेतील काही उमेदवारांनी संघटनात्मक रचनेशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. भविष्यात शिवसेना महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढविण्यासाठी स्वत:ला बळकट करण्यावर भर देणार आहे’
विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२, शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, गेल्या शनिवारपासून सुरू असलेली अंतर्गत चर्चा आणि सस्पेन्सनंतर काल, बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाचा निर्णय स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले होते.