मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेनं संभ्रम संपवला! एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी

शिवसेनेनं संभ्रम संपवला! एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 21, 2022 03:03 PM IST

Eknath Shinde: बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे.

Eknath Shinde - Uddhav Thackeray
Eknath Shinde - Uddhav Thackeray

Shivsena action against Eknath Shinde: शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड पुकारत अर्ध्याहून अधिक आमदारांना फोडण्यात यशस्वी झालेले एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेनं पहिली कारवाई केली आहे. शिंदे यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळं शिंदे यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत.

शिवसेनेच्या २० ते २५ आमदारांसह सुरतमध्ये थांबलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर भाजपसोबत सरकार स्थापण्याचा प्रस्ताव ठेवला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व मी उपमुख्यमंत्री असा तो प्रस्ताव होता. त्यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडं शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

शिंदे यांचा प्रस्ताव मान्य केल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर पाणी सोडावं लागणार होतं. शिवाय, ज्या भाजपसोबत गेली तीन वर्षे संघर्ष केला, त्यांच्याशी तडजोडी कराव्या लागणार होत्या. शिंदे यांचा हा प्रस्ताव मान्य होणं शक्यच नव्हतं. शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करून एक प्रकारे हा प्रस्ताव फेटाळला आहे. शिंदे यांच्या जागी मुंबईतील आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या कारवाईनंतर आता काय होणार याकडं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं पहिलंवहिलं ट्वीट

बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिलं ट्वीट केलं आहे. 'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या