राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचे बॅनर समोर आल्यानंतर आता विरोधकांनी टीका केली आहे.
‘हिंदुत्व’ जपण्यासाठी आपण एकनाथ शिंदे गटात गेल्याचे आमदार यामिनी जाधव यांनी म्हटले होते आता त्यांनी मतदारसंघातील मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले आहे. विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आल्याने मुस्लिम मतांवर डोळा ठेवून बुरखा वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेने बुरखा वाटप कसे काय केले?असा सवाल विरोधक करत आहेत.
बुरखा वितरणाचा बॅनर भायखळा येथे लावण्यात आला होता. हा बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंदुत्ववादी अशी ओळख असलेल्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम केले जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कार्यकर्ते मुलींना शाळेत बुरखा घालण्यापासून रोखत असताना, येथे बुरखादान केले जात आहे. हा ढोंगीपणा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या बॅनरला आणि कार्यक्रमाला पाहून विरोधी पक्षाने शिवसेनेवर संधीसाधू राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याने महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते. मुस्लिम मतांचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला होता. दक्षिण मुंबईतून लोकसभा लढलेल्या यामिनी जाधव यांनाही मोठा फटका बसला होता. भायखळ्यात मुस्लिम मतदारांचे मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे. यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. होमग्राऊंडवरही त्यांना म्हणावी अशी साथ मिळाली नाही.
लोकसभेत बसलेला दणका व आगामी विधानसभा निवडणुकीची चिंता असल्याने मुस्लिम मतांवर डोळा ठेवून यामिनी जाधव यांनी मतदारसंघातील मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. मतदारसंघातील महिलांनीही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला गर्दी केली होती. यामिनी जाधव यांनी एकएक करून महिलांना बुरखे वाटप केले. तसेच विधानसभेला ‘दुवाँ’ राहू द्या, असे आवाहन देखील केले.