राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी कसाबसा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून व मोठ्या नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राज ठाकरे मनसेच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत असून दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. आज राज ठाकरेंची विक्रोळीत सभा होत आहे. या सभेला ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदारसंजय राऊत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. इतकंच नव्हे तर राऊत यांच्यासाठी व्यासपीठावर एक खूर्ची रिकामी ठेवणार असल्याचं मनसेने जाहीर केले आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होतं की, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट गुजरातवरून येत आहे.
मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना अधिकृत निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांच्यासाठी व्यासपीठावर एक खुर्चीही राखीव ठेवण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या मेंदूला गंज लागला असून ते काहीही बोलतात. त्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आल्याचा असा टोला चव्हाण यांनी विचारला.
मनसे नेते मनोज चव्हाण म्हणाले की, शिकले सवरलेले व्यक्ती आहेत, प्रवक्तेपदाच्या माध्यमातून तुमच्या डोक्याला जो गंज चढला आहे. जे बेताल बोलणे सुरु आहे, ते बोलणे कसे असले पाहिजे. वकूबकसाअसला पाहिजे.यासाठीराज ठाकरेंचे विचार, राजकीय माणसाचे विचार कसे असले पाहिजे हे ऐकण्यासाठी या, असे चव्हाण म्हणाले. तुम्ही तुमची पातळी सोडून प्रवक्तेगिरी करायला लागला आहात. ही पातळी पूर्वपदावर येण्यासाठी राज यांची सभा ऐकणे गरजेचे आहे. विचारांची देवाण घेवाण कशी असावी हे शिकण्यासाठी तुम्ही आजच्या विक्रोळीच्या सभेला यावे, अशी आमची विनंती आहे. असे चव्हाण म्हणाले.
‘राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करावी अशीच भाजपची इच्छा आहे. त्यांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट गुजरातहून येतात. त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 'राज ठाकरे हे काय म्हणतात याला महाराष्ट्रात काही किंमत नाही. ते दुसरे मोरारजी देसाई आहेत. राज ठाकरेंना गुजरात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व एकाच वेळी करायचं आहे.
त्यांच्या पक्षाला राज्यात फारसं स्थान नाही. महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेबद्दल राज ठाकरेंच्या मनात काय आहे याबद्दल नेहमीच संशय राहिला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी व अस्मितेसाठी लढत आहेत. हे दोन्ही पक्ष आणि दोन्ही नेते संघर्ष करत आहेत. तो संघर्ष स्वार्थासाठी नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्याच्या गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात हा संघर्ष आहे, असं राऊत म्हणाले.