छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे महत्व कमी करायचे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी शौर्याचं प्रतिक कधीच नव्हतं. त्यामुळे व्हिलन संपवला की नायक आपोआप संपतो. त्यामुळे व्हिलनवर हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायची भाजप, संघाची भूमिका दिसते. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध रहायला पाहिजे, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नागपूर येथे सोमवारी घडलेल्या घटनेनंतर राऊत आज पत्रकारांशी बोलत होते.
राऊत म्हणाले, 'औरंगजेबाची ढाल घेऊन काही लोक या राज्यात हिंदू-मुस्लिम दंगली पेटवत आहेत. सरकार तुमच्या विचाराचं आहे तर मग दंगे कशाला करता? मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हातात कुदळ-फावडे घेऊन कबर आहे तिथं जावं आणि त्यांच्या लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्या, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला. औरंगजेबाती कबर ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक आहे, हे मान्य केलं आहे. औरंगजेब, अफजलखान, शायीस्तेखान येेथे आला पण परत जाऊ नाही शकला. छत्रपती संभाजी राजांनी त्यांच्या मावळ्यांनी त्याची कबर इथेच खणली, असं राऊत म्हणाले.
नागपुरात दंगल पेटवणारे कोण आहेत, त्यांना कुणाची प्रेरणा आहे, महाराष्ट्रात दंगली का पेटवल्या जात आहेत हा महाराष्ट्रात अत्यंत संशोधनाचा विषय आहे. होळीला वातावरण खराब करण्याचं काम केलं. राजापूर आणि अन्य भागात होळीला काय घडलं? होळीसारख्या सणाच्या दिवशी या महाराष्ट्रात कधी दंगली उसळल्या नव्हत्या, असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगा पेटवणे शक्य नाही. असं होत असेल तर मुख्यमंत्र्यांचं गृहखातं अपयशी ठरले आहे, असा याचा अर्थ होतो. गेले दोन दिवस नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची लोकं भडकवणारी वक्तव्य, धमक्या, इशारे देताना आम्ही टीव्हीवर पाहतोय. ही बाहेरून आलेली लोकं नाहीत. ते सगळे नागपूरचेच आहेत. हे चेहरे कोण आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच माहिती असणार. हिंदुंना भडकवण्यासाठी आधी हिंदूंवर हल्ले केले जातात हा दंगलीचा नवीन पॅटर्न आहे, असं राऊत म्हणाले.
नागपूर असो की मुंबई, अशा प्रकारचे हल्ले करण्याची कुणाची हिंमत नाही. आधी हिंदुंच्या मनात भय निर्माण करायचे, नंतर त्यांच्यावर हल्ले करायचे आणि त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे. मग अख्ख्या राज्यात, देशात दंगली पेटवून २०२९च्या निवडणुकीला सामोरे जायचे, हा नवीन दंगल पॅटर्न असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात, देशातच नव्हे तर जगभरात शिवरायाचंच महिमामंडन होत असून आणि ते पुढेही होतच राहणार. आणि हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्र फडणवीस यांची आवश्यकता नसल्याचं राऊत म्हणाले. औरंगजेबाचे उदात्तीकरण फडणवीस यांचेच समर्थक करत आहेत. कबर ही शौर्याचा इतिहास आहे, हे एकदा मान्य केल्यानंतर तुमचेच लोक कुदळ-फावडे घेऊन आसपास फिरत आहेत. असं यापूर्वी कधी झालं नव्हतं. ही एकप्रकारची संघटित गुन्हेगारी आहे, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या