मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माझ्यावरील ‘ते’ आरोप खोटे आणि निराधार, मी दोषी नाही : संजय राऊत

माझ्यावरील ‘ते’ आरोप खोटे आणि निराधार, मी दोषी नाही : संजय राऊत

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 19, 2022 08:51 AM IST

Sanjay Raut On Medha Somaiya Defamation Case: मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ते ऑर्थर रोड तुरुंगात असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मेधा सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर न्यायालयात त्यांनी बाजू मांडली.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (PTI)

Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर तुरुंगात आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी स्वत:ची बाजू मांडताना संजय राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी या प्रकरणात दोषी नाहीय, माझ्यावरील आरोप हे खोटे आणि निराधार आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गुरुवारी त्यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडले. मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ते ऑर्थर रोड तुरुंगात असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी बाजू मांडली.

मेधा सोमयया यांनी संजय राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करताना म्हटलं की, "मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालय उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला. सार्वजनिक शौचालय उभारणी आणि देखभाल प्रकल्पात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच सोमय्या कुटुंबियांच्या युवा प्रतिष्ठान संस्थेचा सहभाग असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांनी आरोप करत माझी मानहानी केली."

मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात यावर सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत यांची वक्तव्ये सकृतदर्शनी मानहानीकारक आहेत असं म्हणत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी प्रॉडक्शन वॉरंट काढावं अशी विनंती मेधा सोमय्या यांच्याकडून करण्यात आलीय. दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी ते ऑर्थर रोड तुरुंगात असल्यांचं सांगितल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचे आदेश दिले. तुरुंग प्रशासनाने संजय राऊत यांना न्यायालयासमोर हजर केले असता मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप मान्य आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी आपल्याला वकीलांशी चर्चा करायला संधी मिळाली नाही असं म्हटलं. तसंच सर्व आरोप फेटाळून लावताना ते निराधार आणि खोटे असल्याचा दावाही केला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या