मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED, CBI, Income Tax: शिंदे गटातील ‘या’ आमदारांमागे सुरूय चौकशीचा ससेमिरा
Shivsena MLA's facing ED, CBI inquiry
Shivsena MLA's facing ED, CBI inquiry
23 June 2022, 6:58 AM ISTHaaris Rahim Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 6:58 AM IST
  • एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ज्या आमदारांचं समर्थन प्राप्त होतय, त्यापैकी काहींच्या विरोधात केंद्रातील ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या चौकशा सुरू आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपण ‘हिंदुत्वा’साठी पक्षातून बाहेर पडलो असं जाहीर सांगताना दिसत आहे. परंतु शिंदे यांना शिवसेनेच्या ज्या आमदारांचं समर्थन प्राप्त होतय, त्यापैकी काहींच्या विरोधात केंद्रातील ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या चौकशा सुरू असल्याचं दिसतं. भाजपसोबत गेल्यास किमान केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुटेल, असं साधं गणित या आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमागे असल्याचं स्पष्ट होतय. (Shivsena MLA's facing ED, CBI inquiry joined Shinde camp)

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई, कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांचा शिंदे गटात समावेश दिसतोय. २०१९ साली राज्यात तीन पक्षांनी मिळून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमुळे काही शिवसेना आमदारांचं स्थानिक मतदारसंघातील गणित बिघडलं होतं. त्या दृष्टिने थेट भाजपच्या गोटात गेल्यास भविष्यात होणाऱ्या निवडणुकांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी थेट सामना करणे सोपे जाईल, या विचाराने काही आमदार शिंदे गटात सामिल झाले असावेत, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. परंतु शिंदे गटात सामिल झालेल्या काही आमदारांची नावे पाहिल्यास विविध केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा सुटण्याच्या आशेने हे आमदार गुवाहाटीला जाऊन मिळाले, हे स्पष्ट होते. भाजपमध्ये गेल्याने मला ईडीवगैरेच्या चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते असं वक्तव्य कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु राणे व सिंह भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व चौकशा बंद झाल्या होत्या.

यामिनी जाधव,

शिवसेना आमदार, भायखळा मतदारसंघ, मुंबई

यामिनी जाधव या मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत. काही महिन्यांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकून तब्बल तीन दिवस घराची झडती घेतली होती. जाधव यांनी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या मालमत्ता व इतर संपत्तीवरून बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे. जाधव यांच्या मालकीच्या काही संपत्तींवर टाच आणली गेली आहे. यशवंत जाधव हे ‘मातोश्री’चे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे यामिनी जाधव शिंदे गटात सामिल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

प्रताप सरनाईक,

शिवसेना आमदार , ओवळा-माजीवाडा, ठाणे

खरं तर ठाणे शहरातील राजकारणात एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोन शिवसेना आमदारांदरम्यानची राजकीय स्पर्धा सर्वश्रृत आहे. तरीसुद्धा प्रताप सरनाईकांनी थेट गुवाहाटी गाठत बंडखोर एकनाथ शिंदेना साथ दिली. यामागे केवळ हिंदुत्वाचा धागा आहे की यापेक्षा आणखी वेगळं कारण आहे, याची साऱ्यांना उत्सुकता लागलीय. प्रताप सरनाईक यांनी ठाणे परिसरात मोठे बांधकाम प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पांमधील गुंतवणूक तसेच एमएमआरडीएतील कंत्राटावरून ईडीने प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा जावे म्हणजे ईडीसारख्या यंत्रणांचा त्रास होणार नाही, असे आवाहन यापूर्वी केले होते.

भावना गवळी,

शिवसेना खासदार, यवतमाळ

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन करणारे पत्र यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी लिहिले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील बालाजी पार्टिकल्स या कारखाना विक्री व अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात खासदार गवळी व त्यांच्या निकटवर्तीयांना ईडीकडून चौकशी सुरू आहे.