
विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अंतिम आठवडा सुरू असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी अधिवेशनातून वॉक आऊट केले आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार करून भास्कर जाधव माघारी परतले आहेत. पुन्हा विधीमंडळात पाय ठेवण्याची इच्छा नसल्याची भावुक प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे. विधानसभेमध्ये बोलू दिलं जात नसल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
विधानमंडळाच्या पायऱ्यांना नमस्कार करत भास्कर जाधव म्हणाले की, मी आज विधानसभेतून बाहेर पडत आहे. बुधवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे.त्यानंतर तीन दिवस बैठका आहेत. मी मुंबई सोडून जात आहे. अधिवेशनात पुन्हा येणार नाही, कारण यायची इच्छा नाही. भास्कर जाधव सभागृहात न चुकता जातो, पण यावर्षी मला जाणून बुजून बोलण्याची संधी दिली जात नाही. मी नियमानुसार बोलण्याचा आणि सभागृहाला कायद्यानुसार चालवण्याचा आग्रह धरतो, तरी विरोधकांना डावललं जात आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.
भास्कर जाधव म्हणाले की, विधीमंडळाच्या परंपरा, कामकाजाचे नियम,कायदे आणि संविधानाचं पालन केलं गेलं पाहिजे. मी दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मला बोलण्याची संधी दिली नाही. कोकणातील रस्ते सुधारण्यासाठी एका अभ्यास गटाची स्थापना करणं गरजेचं आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश होईल, 'असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.
'पुरामुळे चिपळूण, महाडचे खूप नुकसान झाले. कोट्यवधीचे नुकसान झालं असून शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. मात्र देवाच्या कृपेने कोकणात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. या लोकांची मानसिकता संकटात उभं राहण्याची असते. काहीही झालं तरी आत्महत्या करायची नाही, एवढी आत्मनिर्भरता येते कुठून? मी विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकरी आत्महत्येचा मुद्दा उचलून धरणार होतो, पण मला बोलू दिलं गेलं नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या
