राज्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री जनतेच्या भेटीला येणार आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या बाळासाहेब भवन या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दर आठवड्याला सोमवार ते बुधवार असे तीन दिवस तीन सत्रांमध्ये मंत्री भेटीसाठी उपलब्ध असतील. या भेटीसाठी नागरिकांना अर्ज करावा लागणार असून बाळासाहेब भवन येथे अर्ज उपलब्ध केले आहेत. तसेच गुगल फॉर्मच्या माध्यमातून देखील ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. त्यानुसार मंत्र्यांच्या भेटीची वेळ दिली जाईल, असे शिवसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर पक्ष कार्यकर्त्यांनाही या तीन दिवसांत थेट मंत्र्यांना भेटता येणार आहे.
दर सोमवारी मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवनमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सर्वसामान्यांना भेटतील. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनतेची गाऱ्हाणी ऐकतील. तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील.
दर मंगळवारी बाळासाहेब भवन येथे सकाळी ९ ते ११ या गृहराज्य मंत्री, महसूल राज्यमंत्री, पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांची सामान्यांना भेट घेता येईल. सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत वित्त, नियोजन, कृषी मदत व पुनर्वसन, विधी न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेता येईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे मंत्री जनतेच्या समस्या जाणून घेतील.
बुधवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांना भेटता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटता येईल. त्यानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन खार भूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले या दोन मंत्र्यांना भेटता येईल, असे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी निवेदनाद्वार म्हटले आहे.
कामानिमित्त मंत्र्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अर्जातील माहिती सविस्तर भरुन आणि कामाच्या विषयाचा उल्लेख करुन मंत्र्यांची भेट घ्यावी, असे आवाहन पक्ष सचिव संजय मोरे यांनी केले आहे. माहिती भरण्याचे अर्ज गुगल फॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे मोरे यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या