शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केला १ हजार कोटीचा भूखंड घोटाळा; खासदार इम्तियाज जलिल यांचा आरोप
औरंगाबाद MIDC तील ५२ प्लॉट्सचे स्टेटस बदलून त्याचा वापर व्यवसायीक व निवासी उद्दिष्टांसाठी करण्यात येत असून फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगमंत्री असलेले सुभाष देसाई यांंनी यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे.
औरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत (Chikalthana MIDC) उद्योगांसाठी राखीव असलेल्या प्लॉटचे आरक्षण बदलून त्याचे व्यवसायीक (Commercial) व निवासी (Residential) उद्दिष्टांसाठी वापर करून शिवसेना नेते, राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनी आज केला. औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जलिल यांनी हे आरोप केले.
ट्रेंडिंग न्यूज
जलिल म्हणाले, ‘मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर येथील एमआयडीसीच्या प्लॉट्सचे इतर कामांसाठी वापर करण्याबाबतची माहिती एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून मागितली होती. परंतु याबाबत कुणीही पत्राला उत्तर दिलेलं नाही. फक्त औरंगाबाद येथील एमआयडीसीच्या प्लॉटबाबत माहिती मिळाली आहे. औरंगाबाद येथील एमआयडीसीच्या ५२ प्लॉट्सचे स्टेटस बदलून त्याचा वापर व्यवसायीक व निवासी उद्दिष्टांसाठी करण्यात येत असल्याचे जलिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २०१४-१९ यादरम्यान फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगमंत्री असलेले सुभाष देसाई यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाल्याचे जलिल म्हणाले.
औरंगाबाद शहरातील नामवंत लोकांना औद्योगिक कारणासाठी हे ५२ प्लॉट उपलब्ध करण्यात आले होते. या लोकांनी प्लॉटवरील औद्योगिक उत्पादन बंद करून त्याचे निवासी इमारती बांधण्यासाठी वापर केला आहे. याचाच परिणाम म्हणून आज चिकलठाणा येथे भव्य मॉल व निवासी इमारती उभ्या राहिल्या असल्याते जलिल म्हणाले.
एका प्लॉटच्या बदल्या २ कोटी रुपये?
खासदार जलिल म्हणाले, ‘२०१४-१९ दरम्यान राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार होतं. यादरम्यान उद्योगमंत्री असलेले सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत उद्योगांसाठी राखीव असलेल्या प्लॉटचे आरक्षण बदलून त्याचे व्यवसायीक व निवासी वापरासाठीची संमती दिली. या कामासाठी सुभाष देसाई यांचा मुलगा औरंगाबादला नियमित येत असे. शहरातील एका प्रतिष्ठित बिल्डरच्या माध्यमातून एमआयडीसीतील प्लॉटधारकांशी संधान साधून प्रत्येक प्लॉटधारकाकडून २ कोटी रुपये घेऊन आरक्षण बदलून देत असे, असं जलिल म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी खासदार जलिल यांनी यावेळी केली.
खासदार जलील यांचे आरोप बिनबुडाचे आणि निराधारः देसाई
दरम्यान या आरोपांबाबत उशिरा रात्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘खासदार इम्तियाज जलिल यांनी आज पत्रकार परिषदेत माझ्यावर मी उद्योगमंत्री असताना औद्योगिक जमिनींचा घोटाळा केला असा बिनबुडाचा व निराधार आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावे दिले नाहीत. माझ्या चारित्र्यावर अशा रितीने शिंतोडे उडविण्याचाच हा प्रयत्न आहे. आणि म्हणून खा. इम्तियाज जलिल यांनी हे निराधार आरोप त्वरित मागे घेऊन माझी माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा व नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचे ठरविले आहे’, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
संबंधित बातम्या