मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Shivsena Leader Minister Eknath Shinde In Guwahati Bjp News Live Updates

Uddhav Thackeray

Maharashtra political crisis Live: गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले

Eknath Shinde Vs Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे. या घडामोडींचे सर्व अपडेट्स…

Wed, 22 Jun 202204:33 PM IST

शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला पोहोचले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगलादेखील त्यांनी सोडला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत.  जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. तेही बंडखोर आमदारांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

Wed, 22 Jun 202201:52 PM IST

Uddhav Thackeray Speech: माझ्यावर अविश्वासाची वेळ येऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

माझ्या मुख्यमंत्रिपदावर ज्या कोणाला आक्षेप आहे, त्यांनी समोर येऊन सांगावं. मी सोडायला तयार आहे. माझ्यावर कुणी अविश्वास दाखवावा ही वेळ येऊ देणार नाही - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:52 PM IST

Uddhav Thackeray Speech: पदं येत असतात, जात असतात. तुम्ही त्या पदावर बसून काय केलं ही कमाई - उद्धव ठाकरे

पदं येत असतात, जात असतात. त्या पदावर बसून तुम्ही काय केलं हे महत्त्वाचं. मी लोकांना कुटुंबातला एक वाटलो ही माझी कमाई आहे. तरीही मी या खुर्चीला चिकटून बसलेलो नाही. मी सोडायला तयार आहे. हे नाटक नाही - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:52 PM IST

Uddhav Thackeray Speech: एखादा शिवसैनिक म्हणत असेल तर पक्षप्रमुख हे पदही सोडायला मी तयार आहे - उद्धव ठाकरे

ज्या शिवसैनिकांना वाटत असेल मी पक्ष चालवायला नालायक आहे, तर मी पक्षप्रमुख हे पदही सोडायला तयार आहे - उद्धव ठाकरे 

Wed, 22 Jun 202201:52 PM IST

Uddhav Thackeray FB Live: मी राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. तुम्ही या स्वत: घेऊन राज्यपालांकडं जा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray FB Live:ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांनी माझ्याकडं यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांकडं स्वत: घेऊन जावं - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं तुम्ही म्हणत असाल तर मुंबईत येऊन सांगा. मी राजीनामा देतो - उद्धव ठाकरे

माझ्याबद्दलची नाराजी तुम्ही समोर येऊन बोला. उगाच ही शिवसेना ती नाही हे सगळं नको. मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर तसं सांगा. मी वर्षावरून लगेच मातोश्रीवर जातो - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करावं? - उद्धव ठाकरे

मला दु:ख, धक्का, आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं. काँग्रेस, राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री म्हणून नको असतो तर ठीक असतं. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करावं? - उद्धव ठाकरे 

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: अनुभव नसताना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी जिद्दीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला - उद्धव ठाकरे

मला कशाचाही अनुभव नसताना माझ्यावर आलेली जबाबदारी मी जिद्दीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करणारच हा माझा निश्चय आहे. मधल्या काळात वेगळा मार्ग धरावा लागला. शरद पवार साहेब, सोनिया गांधी यांनी विश्वास टाकला. अनुभव नसलेला माणूस पदावर बसवणं यामागे स्वार्थ नसतो. राजकारण वळणाचं असावं पण त्यामागे कपट नसावं - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं तुम्हाला काय दिलं हे लक्षात असू द्या - उद्धव ठाकरे

मधल्या काळात लोकांना जे मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं हे कृपया लक्षात असू द्या - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: हिंदुत्व हे शिवसेनेनं कधीच सोडलेलं नाही - उद्धव ठाकरे

हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री आहे. मग ही शिवसेना कोणाची आहे? काही लोक म्हणतात की ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. असं काय झालं की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही? तसं काहीही झालेलं नाही - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202201:53 PM IST

Uddhav Thackeray FB Live: मुख्यमंत्री भेटत नव्हते हे काही महिन्यांपूर्वी सत्य होतं. त्यामागे माझा आजार होता - उद्धव ठाकरे

आजारपणानंतर मी लोकांना भेटायला सुरुवात केली आहे. भेटत नसतानाही कामं सुरूच होती. रुग्णालयात असतानाही मी तिथून बैठका घेतल्या आहेत - उद्धव ठाकरे

Wed, 22 Jun 202212:14 PM IST

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संवाद सुरू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मी काही वेगळे मुद्दे घेऊन तुमच्यासमोर आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Wed, 22 Jun 202212:14 PM IST

Shivsena: बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा शिवसेनेकडून अखेरचा प्रयत्न,

बंडखोर आमदारांची मनं वळविण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि राहुल कणाल यांचेकडून बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Wed, 22 Jun 202212:14 PM IST

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

Wed, 22 Jun 202211:53 AM IST

Eknath Shinde: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे भूमिका मांडणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हनंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आपली भूमिका मांडणार आहेत. उद्धव ठाकरे यांना ते उत्तर देतात का, हे पाहावं लागणार आहे.

Wed, 22 Jun 202211:51 AM IST

पक्ष सोडून बाळासाहेबांचे सैनिक म्हणून मिरवायचं ही आता फॅशन झाली आहे; अजय चौधरी यांचा बंडखोरांना टोला

शिवसेनेचे आमदार व नवनियुक्त विधीमंडळ पक्षनेते अजय चौधरी यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. 'बंडखोर आमदार स्वत:ला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवताहेत, मग आम्ही कोणाचे सैनिक आहोत? शिवसेना सोडून बाळासाहेबांचे सैनिक म्हणून मिरवायचं ही हल्ली फॅशन झाली आहे, असं अजय चौधरी यांनी म्हटलं आहे.

Wed, 22 Jun 202211:45 AM IST

Uddhav Thackeray: काही क्षणांत उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

काही क्षणांतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. चालू घडामोडींबाबत ते आपली प्रतिक्रिया देतील, असं मुख्यमंत्री कार्यालयानं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Wed, 22 Jun 202211:01 AM IST

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी पाच वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते काय बोलतात याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Wed, 22 Jun 202210:56 AM IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बैठकांचा सपाटा

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घरी बैठकांचा सपाटा सुरू आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांच्यानंतर आता बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनीही फडणवीस यांची भेट घेतली आहे.

Wed, 22 Jun 202210:39 AM IST

Kamal Nath-Sharad Pawar Meeting: काँग्रेस नेते कमलनाथ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

राज्यातील राजकीय सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती शरद पवार यांनी ट्वीट करून दिली आहे.

<p>Kamal Nath - Sharad Pawar</p>
Kamal Nath - Sharad Pawar

Wed, 22 Jun 202208:41 AM IST

Shivsena warns Rebellion MLA: आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत या; शिवसेनेचा बंडखोर आमदारांना इशारा

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत या, अन्यथा कारवाई करू, असा ई मेल शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना पाठवला आहे.

Wed, 22 Jun 202208:34 AM IST

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली असून सरकारच्या भवितव्यावरील सस्पेन्स कायम आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. राज्य सरकार अस्थिर नसून सरकारला कोणताही धोका नाही, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Wed, 22 Jun 202207:52 AM IST

Maharashtra Cabinet Meeting: मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू

राज्यातील सत्ता पेचाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले आहेत.

Wed, 22 Jun 202207:47 AM IST

भाजपकडून जे सुरू आहे, तो राज्यघटनेशी खेळ आहे, कमलनाथ यांची टीका

जे आज महाविकास आघाडीच्या विरोधात आहेत, त्यांना माहीत नाही उद्यानंतर पुढचा दिवसही उजाडणार आहे. मी हे सगळं खूप पाहिलंय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंध राहील असा मला विश्वास आहे, असं काँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांच्या हिताचा निर्णय होईल, असंही त्यांनी विधानसभा बरखास्तीच्या प्रश्नावर सांगितलं.

Wed, 22 Jun 202206:50 AM IST

Maharashtra Cabinet Meeting: आज दुपारनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्य सरकार संकटात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांकडं विधानसभा बरखास्तीची शिफारस करण्याची शक्यता आहे. 

Wed, 22 Jun 202206:10 AM IST

Gulabrao Patil: शिवसेनेचे आणखी एक आमदार व मंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल

शिवसेनेचे आणखी एक आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला ते उपस्थित होते.

Wed, 22 Jun 202206:10 AM IST

Eknath Shinde Live: एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील राजकीय वर्तुळात शांतता

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या ठाणे शहरात शांतता आहे. शिंदे यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची तुकडीही तिथं तैनात करण्यात आली आहे.

Wed, 22 Jun 202205:53 AM IST

Geeta Jain: अपक्ष आमदार गीता जैन देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचल्या

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता भाजपनं सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू केली असून शिवसेनेसोबत असलेल्या अपक्षांना वळविलं जात आहे. शिवसेनेसोबत असलेल्या अपक्ष आमदार गीता जैन या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर पोहोचल्या आहेत.

Wed, 22 Jun 202205:44 AM IST

Uddhav Thackeray-Sharad Pawar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे.

Wed, 22 Jun 202205:34 AM IST

Congress MLA Meeting: कमलनाथ मंत्री बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी, काँग्रेस आमदारांची होणार बैठक

काँग्रेसचे नेते कमलनाथ हे महाराष्ट्रात आले असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन निवासस्थानी पोहोचले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची बैठक थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

Wed, 22 Jun 202205:34 AM IST

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंच्या काहीही मागण्या नाहीत - संजय राऊत

एकनाथ शिंदे जीवाभावाचे मित्र आहेत. आमचं आज सकाळपासून चांगल्या पद्धतीने बोलणं सुरू आहे. त्यांच्या काहीही मागण्या नाहीयेत असंही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Wed, 22 Jun 202205:34 AM IST

Sanjay Raut: सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं वाटत असलं तरी तसं होणार नाही - राऊत

आज सकाळीच एकनाथ शिंदेंशी बोलणं झालं आहे. सगळे शिवसैनिक आहेत आणि त्यांना शिवसेनेसोबतच रहायचं आहे. काही समज, गैरसमज असतात त्यातून हे झालंय. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असं वाटत असेल पण तसं काही होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Wed, 22 Jun 202205:34 AM IST

Sanjay Raut on Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसह सर्वजण परत येतील, संजय राऊत यांना विश्वास

एकनाथ शिंदेंसह आमचे सर्व लोक परत येतील हा आम्हाला विश्वास वाटतो. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदेंशी आमचा व्यवस्थित संवाद आहे. राष्ट्रवादीसोबत आम्ही सत्तेत आहे आणि राष्ट्रवादीबाबत नाराजी असल्याचं कोणत्या आमदाराने म्हटलं मला माहिती नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं.

Wed, 22 Jun 202205:34 AM IST

 Eknath Shinde Live: 'शिवसेना सोडली नाही, सोडणारही नाही पण..', एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह आसामला गेले असून आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Wed, 22 Jun 202205:33 AM IST

NCP Meeting: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील हे शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. राज्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा होणार आहे.

Wed, 22 Jun 202205:32 AM IST

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारांनी कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे उपचार सुरु आहेत.

Wed, 22 Jun 202205:32 AM IST

Bachchu Kadu: काँग्रेसचे काही आमदार संपर्कात, एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडूंचा दावा

मंत्री बच्चू कडू यांनी असा दावा केला आहे की, "आमच्यासोबत सध्या ३६ आमदार असून आणखी काहीजण येतील. यामध्ये काँग्रेसचे काही जण असतील. एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा आकडा ५० पर्यंत जाईल."

Wed, 22 Jun 202205:32 AM IST

 Sandipanrao Bhumre with Eknath Shinde: एकनाथ शिंदे जे सांगतील त्याचं पालन करू - मंत्री संदिपान भुमरे

उद्धव ठाकरेंनी परत येण्याची साद घातलीय पण त्यांचे एकनाथ शिंदेंसोबत काय बोलणं झालं माहिती नाही. एकनाथ शिंदे जे सांगतील त्याचं पालन करू अशी प्रतिक्रिया मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

Wed, 22 Jun 202205:31 AM IST

Rajesh Shirsat: कुणालाही मारहाण नाही, मर्जीने आलेत - आमदार शिरसाठ

शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील. तसंच इथं आलेले आमदार त्यांच्या मर्जीने आले आहेत. कोणत्याही आमदारांना मारहाण झालेली नाही असं एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटलं आहे.

Wed, 22 Jun 202205:30 AM IST

Eknath Shinde Live: माझ्यासोबत ४० आमदार, एकनाथ शिंदेंचा दावा

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सुरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. मध्यरात्री सर्वजण हॉटेलमधून विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर पहाटे ते गुवाहाटीत पोहोचले आहेत. "सध्या ४० आमदार सोबत असून आणखी १० जण इथं येणार असल्याचं", एकनाथ शिंदे म्हणाले.

Wed, 22 Jun 202205:30 AM IST

Eknath Shinde Live: आमच्यासोबत 35 नव्हे तर ४० आमदार - एकनाथ शिंदे

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ३५ नव्हे तर ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. आपण शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. सुरतमधून आसाममधील गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.