Ramdas Kadam Vs Gajanan Kirtikar : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटाचे दोन नेते रामदास कदम व गजानन कीर्तिकर यांच्यात सुरू झालेला कलगीतुरा थांबताना दिसत नाहीए. कीर्तिकरांनी प्रसिद्धी पत्रक काढून आरोप केल्यानंतर कदम हे त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना कदम यांनी कीर्तिकरांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह लावलं.
वय झाल्यानं आपण पुढची निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर कीर्तिकर लढणार नसतील तर मी माझा मुलगा सिद्धेश कदम याला इथून लोकसभेला उतरवतो अशी इच्छा कदम यांनी व्यक्त केली होती. त्यावरून संतापलेल्या कीर्तिकरांनी प्रसिद्धी पत्रक काढून कदम यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यावर गद्दारीचा आरोपही केला.
कीर्तिकरांच्या या आरोपांमुळं दुखावलेल्या कदम यांनी आता थेट कीर्तिकरांचं खासगी आयुष्य काढलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'रामदास कदम याच्याबद्दल बोलण्याचा कीर्तिकरांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. मी कधीही गद्दारी केलेली नाही. उलट कीर्तिकरांनी त्यांच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला पुण्याला जातात, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला.
'तुमचं वस्त्रहरण करायला लावू नका. तुम्ही खरे कोण आहात, हे मला बोलायला लावू नका. तुमची अडचण होईल. माझ्या नादाला लागू नका. वस्त्रहरण केलं तर महिला सुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. मी कडवा शिवसैनिक आहे, शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, असा इशाराही कदम यांनी कीर्तिकरांना दिला.
दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. कदम यांनीच ही माहिती दिली. 'मी कधीही उमेदवारी मागितली नाही. पण गजाभाऊंना उमेदवारी मिळू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यांना उमेदवारी दिली तर ते महिलांची मतं मागू शकतात का? ही विचारणा मी मुख्यमंत्र्यांना करेन. या वयात त्यांचे चाळे काय चाललेत. त्यांच्या आतल्या गोष्टी काय आहेत ते सांगेन. मला नाइलाजानं बोलावं लागेल, असं सूचक वक्तव्यही कदम यांनी केलं.