धर्मवीर २ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राज्यात शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना मारण्यात आले आहे. त्यांचा घातपात झाला, हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, आनंद दिघे यांच्या फक्त पायाला इजा झाली होती. दोन तासातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज होणार होता. डिस्चार्ज कार्डही तयार होते. त्यांना भेटायला सर्व नेते गेले असता ते हसत खेळत बोलत होते, मग अचानक त्यांना हृदयविकारचा झटका येण्याचं कारण काय? इंजेक्शनमधून त्यांना काही दिलं असल्याचा संशय काही लोकांनी व्यक्त केला. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाण्याचं सिंघानिया हॉस्पिटल बंद करण्यात आलं ते अजूनपर्यंत बंदच आहे.
आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांच्या मनाला पटतच नव्हतं. ज्यांना दोन तासानंतर डिस्चार्ज द्यायचा आहे, डिस्चार्ज पेपर तयार होत आहेत आणि दोन तासानंतर बातमी येते की दिघे साहेब गेले. हे कसं शक्य आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी चौकशीची मागणी करतो, असे शिरसाट म्हणाले.
त्या काळात आनंद दिघे यांच्या आजूबाजूला अनेक लोक होते. त्यापैकी अनेकांच्या नावाच्या चर्चा आहेत. मी कुणाचं नाव घेत नाही की यांच्यामुळे मारलं गेलं असावं. ठाण्यामध्ये दिघे साहेबांचं वर्चस्व होतं. लोक त्यांना देव समजायचे. लोकांच्या घरांमध्ये आनंद दिघे यांचा फोटो असायचा. त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे. जे काही खरं खोटं असेल ते जनतेसमोर यायला हवं, असं संजय शिरसाट म्हणाले.
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आनंद दिघे यांचे पुतणे व शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी पलटवार केला आहे, त्यांनी म्हटले की, गेल्या २३ वर्षांपासून हा प्रश्न ठराविक अंतराने सातत्याने विचारला जात आहे. जर शिरसाट यांच्याकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी माझ्याकडे पुरावे द्यावे. मी न्यायालयात पुरावे देतो. लोकांसमोर भुलथापा मारायच्या, कोणतेही सत्य समोर आणायचे नाही आणि राजकारणातून आपली पोळी भाजून घ्यायची हेच यांचे काम असल्याचा टोला केदार दिघे यांनी केला आहे.