मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा अन् तो शिवाजी पार्कवर, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

Dasara Melava : शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा अन् तो शिवाजी पार्कवर, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 30, 2022 05:48 PM IST

शिवसेना एकच आहे. शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे.

शिवसेना दसरा मेळावा
शिवसेना दसरा मेळावा

मुंबई-राज्यातील राजकारणाच्या दृष्टीनं व शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या यंदाच्या दसरा मेळाव्याकडं (Shivsena dasara melava) संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिल्यानंतर आता ठाकरे (uddhav Thackeray) गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर दुसरीकडे शिंदेगट देखील बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यासाठी मेहनत करत आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना एकच आहे. शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हा प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पक्षातून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयानं सर्व बाजू तपासून उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी दिली. त्यामुळं शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसीच्या मैदानावर होणार आहे. त्या मेळाव्याचा व्हिडिओ टीझर काल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आज शिवसेनेनं आपल्या मेळाव्याचा टीझर प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान, शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बसेस बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी येथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या