मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava : ‘या’ कारणामुळे शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दिसेल बदलेला 'भगवा'

Dasara Melava : ‘या’ कारणामुळे शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दिसेल बदलेला 'भगवा'

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 30, 2022 08:06 PM IST

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या पारंपारिक भगव्या झेंड्यामध्ये (saffron flag) बदल करण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिंदे गटाचा भगवा बदलला
शिंदे गटाचा भगवा बदलला

मुंबई–शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या या दसरा मेळाव्यावरून (Shivsena dasara melava) राजकारण चांगलंच तापलं आहे.राज्यातील राजकारणाच्या दृष्टीनं व शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या यंदाच्या दसरा मेळाव्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना आता दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे व ठाकरे गट आमने-सामने येत आहेत.उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे.

दरम्यान दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी सुरू असताना आता महत्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या पारंपारिक भगव्या झेंड्यामध्ये (saffron flag) बदल करण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी झेंड्याचा रंग भगवाच असेल,पण त्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असणार आहेत. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी एक लाख झेंडे बनवण्यात आले आहेत,अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.

शिवसेनेचे दोन्ही दसरा मेळावे जवळपास आहेत,त्यामुळे आपले कार्यकर्ते कोण, हेओळखता यावं,म्हणून भगव्या झेंड्यामध्ये थोडा बदल केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

५ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

दरम्यान, शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बसेस बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी येथे आण्याचा प्रयत्न करत आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या