मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेबांचं नाव इतर कुणीही वापरू शकणार नाही; शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव

बाळासाहेबांचं नाव इतर कुणीही वापरू शकणार नाही; शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 25, 2022 04:30 PM IST

Shiv Sena National Executive Meet: बंडाळीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनात झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray

Shiv Sena National Executive Meet: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बांधबंदिस्तीला सुरुवात केली आहे. रस्त्यावरची लढाई शिवसेनेसाठी नवी नसली तरी कायदेशीर व तांत्रिक बाबींमध्ये कुठलीही त्रुटी राहू नये म्हणून शिवसेनेनं सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करत शिवसेनेनं महत्त्वाचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेल्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली.

हे ठराव पुढीलप्रमाणे

  • शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला. संपूर्ण पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. 
  • उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कार्याचा गौरव करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
  • शिवसेना ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे व राहील. शिवसेना व बाळासाहेब हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय संघटनेला वापरता येणार नाही. कोणताही बेईमान व गद्दार या नावानं स्वत:चा स्वार्थ साधू शकणार नाही.
  • बाळासाहेबांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार शिवसेना पुढं घेऊन जाईल. अखंड महाराष्ट्र व मराठी अस्मितेशी शिवसेना कधीही प्रतारणा करणार नाही. 
  • ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना देण्यात आले.
  •  महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढेल आणि भगवा फडकवेल.

तीन नेत्यांची दांडी

शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला तीन नेते अनुपस्थित होते. त्यापैकी एकनाथ शिंदे हे स्वत: बंडखोरांचं नेतृत्व करत आहेत. रामदास कदम हे देखील बैठकीला अनुपस्थित होते. रामदास कदम हे नेमके कुठं आहेत याबद्दल कोणालाही कल्पना नाही. मात्र, शिवसेनेचे आमदार असलेले त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळं रामदास कदम यांनी बैठकीला दांडी मारली असावी असं बोललं जात आहे. माजी मंत्री व शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते हे देखील बैठकीला नव्हते. मात्र, त्यांनी आधीच तशी माहिती देऊन परवानगी घेतली होती, असं सांगितलं जातं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या