गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना लिलिलेलं भावनिक पत्र व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनातली खंत उघड करायची आहे, आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण केलं गेलं असं भास्कर जाधवांनी या पत्रात म्हटलंय. त्यामुळे तेही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचा चर्चा होत्या. आता भास्कर जाधव यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चिपळूणमध्ये संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करत पक्षांतर्गत वादावरुन निशाणा साधला आहे.
शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी भास्कर जाधव हेही गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते,आम्ही त्यांना सोबत घेण्याला विरोध केला,असा दावा केला होता. त्यावरही भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आपण उद्धव ठाकरेंबरोबरच राहणार असल्याचं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलं. आम्ही मैदान सोडणारी माणसं नाही. मी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या. तुम्ही काहीही करा,पण माझा शब्द आहे. २०२४ ची विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. त्यामुळे कालच्या बातम्या पेरण्यात आल्या. मग त्यांना मी कशाला उत्तर देऊ?
घर भेद्यांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. हा आमचा नाही. हा भास्कर रावांचा आहे त्याला बाहेर काढा हे कोण सांगत होते? चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत मी हे पहिल्यांदा पाहिले," असे म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत वादावर थेट निशाणा साधला.
पक्षांतर्गत वादावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मी काहीतरी मिळेल म्हणून लढत नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं. पक्ष फुटल्यानंतर कुणाला गटनेते करायला हवे होते? विधानसभेत कुणाचा आवाज आहे?मी बाकीच्याप्रमाणे माझ्या निष्ठेचे किस्से कुणालाही सांगत नाही. पण आज सांगायची वेळ आली आहे. तुम्ही कुठेही जा पण तुम्ही भाजप सोबत गेला तर भास्कर जाधव तुमच्या सोबत नाही हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. यावर सगळे गेले तरी चालतील आपण दोघांनी राहायचं असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. आज भास्कर जाधव लढतोय तो पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दासाठी लढतोय. गद्दारांपासून सावध करण्यासाठी हे पत्र होतं. मी माझ्या पोरासाठी काहीही करत नाही. त्याच्यात कर्तुत्व आहे तो पुढे जाईल. माझ्या शिवसेनेवर आणि पक्षप्रमुखावर अन्याय झाला त्यासाठी मी लढत आहे.
भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षफुटीवेळी घडलेला एक किस्सा सांगितला. २० जूनला राज्यसभेसाठी मतदान झालं व २१ तारखेला हे सगळे सूरतला गेले. त्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठक होती. मी पोहोचलो तेव्हा तेव्हा बैठक संपत आली होती. ११ खासदार उपस्थित होते. १७-१८ आमदार वगळता बाकी सगळे उपस्थित होते. तेव्हा तिकडे गेलेले हे आमदारही होते. बरेच आमदार आपण भाजपाबरोबर जायला हवं असा सल्ला उद्धव ठाकरेंना देत होते,असा दावा भास्कर जाधव यांनी केला. मी तिथे उद्धव ठाकरेंना सांगितलं की तुम्ही पक्षप्रमुख आहात,तुम्हा काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा,पण तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल. हे सगळ्यांसमोर मी त्या बैठकीत उद्धव ठाकरेंना सांगितलं.