Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का, भाजपचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का, भाजपचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार!

Maharashtra Election 2024 : महायुतीला धक्का, भाजपचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार!

Oct 18, 2024 03:57 PM IST

Maharashtra Election 2024 : महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केलं आहे

भाजपचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार!
भाजपचा आणखी एक घटक पक्ष साथ सोडणार!

महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अनेक पक्षात आउटगोईंग तसेच इनकमिंग वाढले आहे. त्यातच आघाड्यांमधील घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण करताना नेत्यांच्या नाकी नऊ आले आहे. निवडणूक जाहीर होताच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी स्वबळाचा नारा देत महायुतीला पहिला जबर धक्का दिला. जानकर यांच्यानंतर आता आणखी एका घटक पक्षाने महायुतीची साथ सोडली आहे. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असून राज्यातील पाच जागांवर निवडणूक लढणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाने जाहीर केलं आहे. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती विनायक मेटे (jyoti Vinayak mete ) यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्योती मेटे यांनी म्हटले आहे की, महायुती शिवसंग्रामला सोबत घेऊन जाण्याची मानसिकतेत दिसत नाही. आम्ही राज्यातील पाच जागांवर लढणार असून आमच्यासमोर सर्व पर्याया खुले आहेत. घटक पक्षाला बळ देण्याचे दूरच पण सोबतही घेऊन जाण्याचं काम भाजपकडून होत नाही आहे. त्यामुळे शिवसंग्राम पक्ष आपली वेगळी भूमिका घेईल, असं ज्योती मेटे यांनी म्हटले आहे. 

विनायक मेटे यांचं निधन झाल्यानंतर शिवसंग्रामला सत्तेत वाटा मिळाला नाही. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा प्रश्नही सुटला नाही. शिवसंग्रामचा राजकीय पटलावरती विचार केला नाही. शिवसंग्राम ज्यांच्या सोबत असेल ते विजयापर्यंत जातील. शिवसंग्राम सोबत नसेल त्यांचा पराभव होईल. आरक्षणाच्या प्रश्नावर मराठवाड्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता मतपेटीतून बाहेर पडेल. गरज सरो आणि वैद्य मरो ही भाजपाची, महायुतीची भूमिका आहे आणि त्याची सल मनात असल्याची भावना ज्योती मेटे यांनी व्यक्त केली.

मेटे साहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे ज्योती मेटे यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची भेट बीड विधानसभा संदर्भात होती. विधानसभा निवडणुकीच्या रणनीती अनुषंगाने आमची सकारात्मक चर्चा झाली. महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत देण्यासाठी अनुकूल नसेल तर शिवसंग्राम स्वतंत्र लढणार असल्याचंही ज्योती मेटे यांनी सांगितलं.

शिवसंग्राम पक्षामध्ये फूट –

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात मोठी फूट पडली असून विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जय शिवसंग्राम या नव्या संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. 

रामहरी मेटे हे त्यांच्या याच नव्या संघटनेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात करणार आहेत. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आली होती. मात्र काही दिवसांपासून रामहरी मेटे आणि ज्योती मेटे यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते आणि याच वादातून रामहरी मेटे हे पक्षातून बाहेर पडले आहेत. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर