मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vinayak Mete: दोन आठवड्यांपूर्वी मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न; शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांचा दावा

Vinayak Mete: दोन आठवड्यांपूर्वी मेटेंच्या घातपाताचा प्रयत्न; शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांचा दावा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 16, 2022 02:43 PM IST

Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या मातोश्रींनीसुद्धा आमदार, मंत्री करायचं नव्हतं, पण लेकराला मारायचं नव्हतं असं म्हणत शोक व्यक्त केला होता. तर पत्नी ज्योती मेटे यांनीही या संपूर्ण घटनेची चौकशी करावी असं म्हटलं आहे.

विनायक मेटे
विनायक मेटे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Vinayak Mete: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर आता अपघाताबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी प्रश्न उपस्थित केल्यानतंर विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनीसुद्धा अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. विनायक मेटे यांच्या मातोश्रींनीसुद्धा आमदार, मंत्री करायचं नव्हतं, पण लेकराला मारायचं नव्हतं असं म्हणत शोक व्यक्त केला होता. तर पत्नी ज्योती मेटे यांनीही या संपूर्ण घटनेची चौकशी करावी असं म्हटलं आहे. दरम्यान, आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. विनायक मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टला घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता असा धक्कादायक खुलासा शिवसंग्रामच्या बीडमधील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शिवसंग्रामचे बीडमधील पदाधिकारी अण्णासाहेब माळकर यांनी म्हटलं की, "बीडहून पुण्याला जात असताना दोन गाड्यांनी शिक्रापूरजवळ विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला होता. त्यामुळे आता खरंच अपघात झाला की घातपात झाला असा प्रश्न उपस्थित होतोय. ३ ऑगस्टला विनायक मेटे हे बीडहून पुण्याला निघाले होते. तेव्हा शिक्रापूरच्या जवळ दोन गाड्यांनी विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी गाड्यांनी आमच्या गाडीला कट मारायचा प्रयत्नसुद्धा केला होता. मी तेव्हा त्यांच्यासोबतच होतो."

आयशर गाडी आपला पाठलाग करत असल्याचंही विनायक मेटेंना तेव्हा सांगितलं होतं. यावर विनायक मेटेंनी गाडीचा त्या गाडीचा चालक नशेत असेल म्हणून पाठलाग करत असेल असं म्हटलं होतं. आता २४ तारखेला पहाटे अपघातातसुद्धा पाठलाग करणारीच गाडी असेल तर हा घातपात असू शकतो. असं असेल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारासुद्धा माळकर यांनी दिला आहे.

विनायक मेटे हे १४ तारखेला मराठा समन्वय समितीच्या बैठकीसाठी बीडहून मुंबईला निघाले होते. तेव्हा त्यांचा कारचा खालापूर टोल नाक्याजवळ अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनायक मेटे यांचं निधन झाले. अपघातानंतर आपल्याला मदत मिळायला उशीर झाल्याचं विनायक मेटे यांच्या चालकाने म्हटलं होतं. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं.

WhatsApp channel