Wagh nakh : शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wagh nakh : शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन

Wagh nakh : शिवरायांची वाघनखं पोलीस बंदोबस्तात साताऱ्यात दाखल, १९ जुलैपासून प्रदर्शन

Updated Jul 17, 2024 08:54 PM IST

Shivaji maharaj wagh nakh : लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. लंडनहून ही वाघनखं मुंबईतआणली गेली त्यानंतर ती साताऱ्याकडे रवाना करण्यात आली.

शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात दाखल
शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात दाखल

Shivaji maharaj wagh nakh : शिवप्रेमी ज्या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात होते ती शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं लंडनहून अखेर महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.लंडनहून ही वाघनखं मुंबईतआणली गेली त्यानंतर ती स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याकडे रवाना करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही वाघनखं साताऱ्यात आणली गेली. पुढील दहा महिने ही वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील.

महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू आजही १६ व्या शतकातील मराठ्यांच्या शौर्याची आणि किर्तीची साक्ष देत आहेत. त्यापैकीच एक असेलल्या शिवरायांच्या वाघनखांचं आज लंडनहून भारतात आगमन झालं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १९ जुलै रोजी साताऱ्यात प्रदर्शनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील. १९ जुलैला साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींना ही वाघनखं पाहता येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढण्यासाठी जी वाघनखं वापरली तीच वाघनखं असल्याचं सांगितलं जात आहे. ही वाघनख जेव्हा महाराष्ट्रात येणार अशी माहिती राज्य सरकारने दिली. तेव्हा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरली नसल्यचा दावा केला होता. सुधीर मुनंगटीवर यांनी ही वाघनखं शिवाजी महाराजांशी संबंधित असल्याचं म्हटलं आहे.

पुढील तीन वर्षांसाठी ही वाघनखं भारतात आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही वाघनखं राज्यातील ४ संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे.

शिवरायांच्या वाघनखं भारतात आणण्यासाठी १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात सांगितले होतं. ते म्हणाले होते की, विधीमंडळ अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च वाघनखं आणण्यासाठी झाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर