Jaydeep Apte : शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक, रात्रीच्या वेळी पत्नी व आईला भेटायला आला अन्..-shivaji maharaj statue collapsed case jaydeep apte arrested in kalyan ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jaydeep Apte : शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक, रात्रीच्या वेळी पत्नी व आईला भेटायला आला अन्..

Jaydeep Apte : शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक, रात्रीच्या वेळी पत्नी व आईला भेटायला आला अन्..

Sep 04, 2024 11:47 PM IST

Jaydeep apte arrested : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांना सापडला आहे. त्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.

शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक
शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेला अटक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटी पुर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांना सापडला आहे. त्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे.जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या घरी आला होता. मात्र अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.पुतळा दुर्घटना होऊन दोन आठवडे होत आले तरी जयदीप आपटे पोलिसांना सापडत नव्हता. आपटे विरोधात पोलिसांनी मंगळवारी लुकआऊट नोटीस जारी केली होती. पुतळा कोसळल्यानंतर अभियंत्याला अटक केली होती मात्र आपटे फरार होता. अखेर त्याला पोलिसांनी शोधून काढले आहे. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे.

शिल्पकार जयदीप आपटे पुतळा दुर्घटनेपासून फरार होता. त्यामुळे राज्य सरकारनेच त्याला लपवून ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. नाना पटोले यांनी आपटे पाकिस्तानात पळून गेला काय, असा टोला लगावला होता. आपटेच्या शोधासाठी पोलिसांनी अनेक पथके गठित केली होती. घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय कल्याणमधील राहते घर सोडून शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पण पोलिसांनी तिथे जावून जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याण येथील राहत्या घरी आले होते. पोलिसांनी तिथे देखील त्यांची चौकशी केली होती. जयदीप सापडत नसल्याने पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली होती. अखेर आज रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत आपटे पत्नी व आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

सिंधुदुर्गात मालवण येथे राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उद्घाटनाच्या केवळ ८ महिन्यात २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. त्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांनी या पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं होते. याप्रकरणी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर माफी मागावी लागली होती. मात्र तरीही हे प्रकरण शांत झाले नव्हते. सरकारने पुतळा दुर्घटनेच्या चौकशीसाठी तसेच पुन्हा पुतळा उभा करण्यासाठी दोन समित्या गठित केल्या आहेत.